अमरावती प्रतिनिधी @राजू कलाने
कत्तलीच्या उद्देशाने नागपूर वरून अमरावतीच्या दिशेने तिवसा मार्गाने गोवंशाची निर्दयतेने कोंबून वाहतूक केल्या जात आहे.तिवसा पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी 2 मालवाहू ट्रक पकडून 72 जनावरांना जीवदान दिल्यानंतर आज (ता.25) रोजी आणखी एक ट्रक पोलिसांनी पकडून त्यातील 28 जनावरांची सुटका केली तर 2 जनावरे मृत्यु पडली आहे.
चेकपोस्ट असतांनाही त्याला न जुमानता दररोज 10 ते 15 ट्रक,पीकअप वाहने तिवसा मार्गाने गोवंश जनावरांना कोंबून अतिशय छुप्या पद्धतीने भरधाव जातात.तिवसा पोलिसांनी अनेकदा या वाहतुकीला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र यातील पिकअप वाहने ही अतिशय सुसाट धावून अक्षरशः चेकपोस्टवर न थांबता भरधाव सुटत असल्याने एकच भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मालवाहू ट्रकवर टाळपत्री झाकून जनावरांना ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असलेला ट्रक क्र.एमएच 31,डिएस 7786 हा तिवसा मार्गे अमरावती कडे जात असताना त्यात जनावरे असल्याचा संशय पोहेकॉ दीपक सोनाळेकर यांना चेकपोस्टवर येताच त्यांनी सदर ट्रक पकडून ठाण्यात लावला.यामध्ये 30 जनावरांपैकी 2 जनावरे गुदमरून मृत्यूमुखी पडले.उर्वरित 28 जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने केकतपुर येथील गोरक्षणात रवाना करण्यात आली आहे.यातील 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दीपक सोनाळेकर करीत आहे.

