हिवरखेड प्रतिनिधी@जितेश कारीया
सातपुड्यातील स्थलांतरित झालेले आणि हिवरखेड रेल्वे स्टेशन नजीक एका शेतात वसलेले आदिवासी बांधवांचे नवी तलाई हे गाव मूलभूत सुविधांपासून कोसो दूर होते. विशेष म्हणजे हे गाव अंधारलेले होते. तिथे वीज पुरवठा सुद्धा नव्हता. ह्या समस्या सोडविण्यासाठी माजी जि प सदस्य गोपाल कोल्हे यांनीसुद्धा पाठपुरावा केलेला आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सक्रिय पत्रकार बांधवांनी ह्या गावाच्या व्यथांना वेळोवेळी वाचा फोडत सर्व समस्या चव्हाट्यावर आणल्या होत्या. काही दिवसांपूर्वी नवी तलाई च्या बातम्या वाचून विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी तलाई ला भेट देण्याचे ठरविले. आणि तात्काळ तलाई येथे दौरा केला. येथे विद्युत पुरवठा सुरु करण्याच्या आणि विद्युत जोडण्याचे रखडलेले काम तत्काळ मार्गी लावण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून तात्काळ रखडलेली कामे पूर्ण करून घेतली. आणि
22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार अमोल मिटकरी यांनी नवी तलाई हे गाव दत्तक घेतले आणि त्याच दिवशी गावात वीज पुरवठा सुरू झाला. अर्ज केलेल्या 80 घरांमध्ये विद्युत जोडणी देण्यात आली. आणि तेथे प्रकाश पर्व साजरा करण्यात आला. ह्यासाठी महावितरण सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचार्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. यावेळी आदिवासींच्या चेहऱ्यावरील हास्य वाखाणण्या सारखे होते. विद्युत पुरवठा सुरू झाला तरी हे गाव दत्तक घेतल्यामुळे या गावातील सर्व मूलभूत समस्या मार्गी लावून या गावाला विकासाची वाट दाखविण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे वचन आमदार मिटकरी यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी 61 दिवे लावून आणि केक कापुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक गावांसाठी सॅनिटायझर मशीन, मास्क, सॅनिटायझर, इलेक्ट्रिक लाईट, महिलांना साडीचोळी, अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी पत्रकार बांधव, आणि सर्व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

