येवला प्रतिनिधी @ माधव नेहे
पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांचे सतर्कतेमुळे व दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून डोंगराच्या कड्यावरून घसरून जखमी इसमाचे प्राण वाचले. सावरगाव तळ चे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांच्या या कार्यतत्पर व संवेदनशील मनाचे सर्वांनी कौतुक केले आहे.
याबाबदची घटना अशी की, संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथे रविवारी दि.१२ला सकाळी सात वाजेच्या दरम्यान एक व्यक्ती सावरगाव तळ वनविभागाच्या गट नं ८९८ मधील हजार फूट उंच डोंगराच्या कड्यावरून पाय घसरून पडल्याने जंगलाच्या जवळच वस्ती असलेल्या वैभव नेहे, सतीश नेहे, गोकुळ नेहे व माधव नेहे यांनी पहिली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना दिली. पोलीस पाटील यांनी माजी उपसरपंच शिवनाथ नेहे यांचेसह तातडीने डोंगरावर धाव घेतली. ही व्यक्ती अतिशय गंभीर अवस्थेत जखमी होती त्याची प्राथमिक चौकशी करून ओळख पटविण्यात आली. सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील अशोक गणपत अघाणे वय ३५ वर्ष असे जबर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे . त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती कळवून त्याला तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे व त्याचा जीव वाचावा म्हणून शासकीय रुग्णवाहिकेला फोन करून मदतीची मागणी केली. परंतु शासकीय रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने शेवटी संगमनेर येथील संजीवनी रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. तोपर्यंत या इसमास उंच डोंगरावरून खाली सपाट भागात आणणे आवश्यक होते. त्यांचे पाय फॅक्चर असल्याने त्याला चालण्याचे त्राण नसल्याने रुग्णवाहिकाच्या रस्त्याला आणणे आवश्यक होते. सध्याची कोरोना रोगाच्या साथीच्या आजाराच्या परिस्थितीमुळे या इसमाजवळ कोणीही जाऊन त्याला उचलीत नव्हते. अनोळखी इसमाला हात कसा लावायचा यामुळे कोणी मदत करण्यासाठी पुढे येईना मात्र शेवटी पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ग्रामस्थ गोकुळ नेहे,माधव नेहे,जालिंदर येरमल, गणेश सावळे,भाऊसाहेब दुधवडे, विजय दुधवडे, वैभव नेहे, किशोर पवार यांना मदत करण्याची विनंती केली स्वतः चादरीची झोळी केली. मग मात्र ग्रामस्थांनी मदत केली व या जखमी इसमास उंच डोंगरावरून झोळी करून रुग्ण वाहिकेच्या रस्त्यापर्यंत आणले. तोपर्यंत रुग्णवाहिका आलेली असल्याने त्याला वैद्यकीय उपचारासाठी तातडीने पाठविण्यात आले. सदर इसमावर संजीवनी रुग्णालयात संगमनेर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटल घोटी येथे नेण्यात येणार आहे.
सदर घटनेची माहिती वनविभाग, पोलीस अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. गावचे पाटील सतर्क असलेमुळे एखादया व्यक्तीचे प्राण वाचू शकतात असे आदर्श काम गोरक्ष नेहे यांनी केले आहे.

