व्यापारी प्रतिष्ठाने नियमित सुरु ठेवा !! लक्षणे नसणाऱ्या बाधितांना ठेवा होम क्वारंटाईन
अमरावती प्रतिनिधी @ राजू कलाने
कोरोना संसर्गजन्य आजाराकरीता सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्या संदर्भात सोमवार दिनांक २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली . या बैठकीला पालकमंत्री यशोमती ठाकूर , अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके , जिल्हाधिकारी शैलेश नवाल , मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्यामसुंदर निकम , मनपा आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . हरिबालाजी एन . मनपा शहर आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . दिलीप रणमले , आदी उपस्थित होते . या बैठकीमध्ये आमदार सुलभा खोडके यांनी शहरात पी १,पी २,प्रणाली अंतर्गत सुरु असलेली व्यापारी प्रतिष्ठाने संदर्भात मुद्दा मांडला . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाप्रशासनाकडून सम -विषम ( ऑड अँड इव्हन )पद्धतीने शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्यास गेल्या ५ जून पासून परवानगी दिली आहे .परंतु या प्रणाली ला घेऊन नागरिकांमध्ये अनभिज्ञता व संभ्रम निर्माण झाल्याने आपल्या पसंतीचे दुकाने नेमके कधी सुरु आहे , हे निश्चित नसल्याने अनेक ग्राहक हे खरेदीविनाच निराशेने परतत होते . तसेच सम -विषम पद्धतीने दुकाने सुरु असल्याने नागरिकांची देखील वस्तू खरेदीसाठी एकक गर्दी होतांनाचे दृश्य बघायला मिळाले . यामुळे सोशल डिस्टंसिंगचे सुद्धा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले . त्यामळे हि प्रणाली व्यापारी व ग्राहकांकरिता गैरसोयीची ठरू पाहत असल्याने पी १ ,पी २ ऐवजी नियमित व्यापारी प्रतिष्ठाने सुरु करण्यासंदर्भात आ. सुलभा खोडके यांनी या बैठकीत मुद्दा उपस्थित केला . तसेच याबाबत मागील आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भातील आमदारांसोबत घेतलेल्या वेबिनार मध्ये सुद्धा आ सुलभा खोडके यांनी व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी नियमित बाजारपेठ सुरु होणे गरजेचे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती . दरम्यान या बैठकीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुलभाताईंच्या मागणीबाबत सकारात्मकता दर्शवित लवकरच निर्णय घेऊन कार्यवाही करणार असल्याचे सूतोवाच केले . तसेच ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाही पण त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली . अशा रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेता यावा , या विषयावर देखील आ. सुलभा खोडके यांनी बैठकीत सर्वांचे लक्ष वेधले . जे रुग्ण घरीच क्वारंटाईन राहून स्वतःची व्यवस्था करू शकतात , त्यांच्या मागे वैद्यकीय यंत्रणा खर्च न करता त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर होम क्वारंटाईन केल्यास गरजू रुग्णांकडे प्रभावीपणे लक्ष देता येईल ,अशी भूमिका आमदार महोदयांद्वारे मांडण्यात आली . तत्पूर्वी यासंदर्भात आ. सुलभात खोडके यांनी इंडियन मेडिकल असोशिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष डॉ . अनिल रोहणकर यांच्याशी चर्चा केली असता कोरोनाची लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला हॉस्पिटल क्वारंटाईन करण्या ऐवजी डॉक्टरांनी घरीच जाऊन उपचार करता येत असल्याचे डॉ .अनिल रोहणकर यांचे म्हणणे आहे . तर राज्य शासनाने देखील याबाबत परवानगी दिली असल्याचे आ. सुलभा खोडके यांनी बैठकीत स्पष्ट केले . त्यामुळे अशा रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घरीच औषधोपचार करण्याची मुभा मिळावी ,अशी भूमिका आ. सुलभा खोडके यांनी मांडली असता जिल्हा प्रशासनाने यावर सुद्धा सकारात्मकता दर्शवून लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले . राज्य शासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉग २ चा कालावधी येत्या ३१ जुलै ला संपत आहे . राज्यात या पुढे लॉकडॉन नाही असे सूतोवाच याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे . त्यामुळे आता १ ऑगस्ट पासून व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी नियमित बाजारपेठ सुरु होण्याचे संकेत असून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे .

