कामावरून काढल्याने सुरक्षारक्षक बेरोजगार तर ग्राहकांची हेळसांड
धिरज बजाज हिवरखेड
हिवरखेड येथील सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये काही महिन्यापूर्वी पर्यंत नियमित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होती. त्यामुळे एटीएम सुरक्षित, स्वच्छ, नीटनेटके, आणि सुरक्षारक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ग्राहक अनुकूल राहायचे. मात्र काही महिन्यांपासून सेंट्रल बँकेच्या एटीएम मधील सर्वत्र सुरक्षारक्षकांना अचानक कामावरून काढून टाकल्याने आता हिवरखेड मधील सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये कुत्र्यांचे राज्य असून नागरिकांना कुत्रे चावण्याच्या भीतीच्या सावटाखाली व्यवहार करावे लागत आहेत. हिवरखेड परिसरात मोकाट कुत्र्यांच्या हैदोस आहे. यामुळे अनेक जणांना कुत्रे चावलेले आहेत. आणि कुत्रे चावण्याची मालिका कायम सुरूच आहे.
सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये कुत्र्यांचे साम्राज्य तर आहेच सोबतच सुरक्षारक्षकांना कामावरून काढल्याने एटीएम मध्ये सर्वत्र कचरा, घाण, धुळ, साचलेले असून मच्छरांच्या साम्राज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. अनेकदा एटीएम मध्ये (रोकडा) पैसेच नसल्याने ठणठणाट राहत असल्याने सुद्धा ग्राहकांची नेहमीच ओरड असते.
या सर्वच प्रकारांकडे सेंट्रल बँक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून ग्राहकांची प्रचंड हेळसांड होत आहे. वरिष्ठ पातळीच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या सर्व गंभीर प्रकारांची दखल घेऊन हिवरखेड एटीएम वर सुरक्षारक्षक नेमून परिस्थिती सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
सुरक्षा रक्षक नियुक्ती एजन्सीमार्फत केलेली होती त्यामुळे त्यांना कामावरून काढण्याची जबाबदारी सेंट्रल बँकेचे अधिकारी आणि एजन्सीचे अधिकारी एकमेकांवर ढकलत आहेत.
आम्हाला एटीएमच्या सुरक्षा रक्षक पदावरून अचानक काढून टाकल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कृपया ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी व आमची उपासमार टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला पुन्हा रुजू करून घ्यावे. - सतिश अग्रवाल, हिवरखेड
