मो.असलम परवेज: तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव बघता १६ मार्चपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १६ मार्च चे सकाळी ८ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी काढला आहे.
या आदेशान्वये दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी ६ ते दुपारी ३ व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यात सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून ५० टक्के संख्या ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता ५० व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. मॉर्निंग वॉक ला परवानगी असेल.
सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणी १० व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, खाजगी शिकवणी केंद्र बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल.
सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रूग्णालय बंदचा आधार घेवून रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. जिल्ह्यातील ॲम्बुलन्स सेवा २४ तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतुक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. या कालावधीत संपन्न होणाऱ्या पुर्वनियोजित परीक्षा त्यांचे वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. गर्दी जमवून करण्यात येणारी निर्दशने, मोर्चे, रॅली, आंदोलने यांना बंदी राहील. मात्र केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधीत शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
