संग्रामपुर प्रतिनिधी
रिलायन्स विमा कंपनीने मागील वर्षाची रोखून ठेवलेली रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी दिल्याने विमा भरपाई रक्कम मिळण्याचे संकेत आहेत. या संदर्भात स्वाभिमानीचे मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कृषिमंत्री यांना या संदर्भात निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. स्वाभिमानाची विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यासाठी संबंधित यंत्रणा यांना काल निवेदन दिले. याच निवेदनाचा पाठपुरावा करत आमदार देवेंद्र भुयार यांनी कृषिमंत्री नामदार दादा भुसे यांना विनंती पत्र देऊन मागील वर्षाचा पिक विमा नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. अशी मागणी आज १३ मे रोजी केली आहे.
यावर नामदार भूसे यांनी सकारात्मक सहमती दर्शवून रिलायन्स विमा कंपनी व संबधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून शक्य तेवढ्या लवकर भरपाई रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन दिल्याने आता २०२० चा पिक विमा रक्कम मिळण्याची आशा नक्कीच वाढली आहे. मागील वर्षी सोयाबीन कापूस पिकाचा लागत खर्च निघाला नाही. हे सत्य परिस्थिती असतांना विमा रक्कम उतरवलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. कोरोना महामारी पुढ्यात आलेले पेरणीचे दिवस व शेतकऱ्यांचे आर्थिक अवस्था अशा एकूणच दृष्टचक्रात शेतकरी अडकला आहे.
कंपनीने मागील वर्षीचा विमा रक्कम न दिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होईल हे नक्कीच आहे. म्हणून संबंधित विमा कंपनीला भरपाई देण्याचे निर्देश द्या. अशी मागणी आमदार भुयार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. प्रशांत डिक्कर यांनी गेल्या सहा महिन्यापासून हे मागणी शासनाकडे रेटुन धरल्याने आता याची भरपाई मिळण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत
