प्रतिनिधी अमरावती प्रदीप रघुते
नगरपालिकेच्या राखीव जागेवरील अतिक्रमण प्रकरण
कारंजा नगर पालिकेच्या शहर विकास आराखड्यात शॉपिंग सेंटर करीता राखीव असलेल्या जमिनीवर परिसरातील नगरसेवक सच्चानंद थद्दानी यांनी अनाधिकृतपणे तार कंपाऊंड करून अतिक्रमण केल्याची तक्रार स्विकृत नगरसेवक निसार खान नजीर खान यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की,रेल्वे स्टेशन समोरील सिंधी कॅम्प परिसरातील नगर पालिकेच्या राखीव जमिनीवर नगरसेवक सच्चानंद थद्दानी यांनी आपल्या पदाचा गैरउपयोग करून सदर जमिनीवर अनाधिकृतपणे तार कंपाऊंड करून अतिक्रमण केले आहे.सदर जमीन अतिक्रमण मुक्त करून संबंधित नगर सेवकावर कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी निसार खान यांनी केली आहे.तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील गरीब अतिक्रमण धारकांवर नगर पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचे दिसून येते. मात्र धनदांडग्या लोकांवर कारवाई होत नसल्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
