अकोला प्रतिनिधी पंकज शिरसाट
दि.२३.जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या ४२ जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत १९ जुलै रोजी मतदान तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, तर इच्छुक उमेदवार १९ जूनपासून ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकतील. (Akola Zilla Parishad Panchayat Samiti Election Program)
जिल्हा परिषद राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे मार्च २०२१ मध्ये अकोला जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितींच्या २८ जागांवर गडांतर आले होते.
तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतींसह उपसभापतींना सुद्धा त्यांचे पद गमवावे लागले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रिक्त जागांसाठी महिला आरक्षण सुद्धा काढण्यात आले होते. परंतु नंतरच्या काळात राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय घडामोळींना वेग आला आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीच्या तारखांची सूचना व कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध करण्याची तारीख - २९ जून २०२१
- संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्वीकारण्याचा कालावधी - २९ जून ते ५ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३)
- नामनिर्देशन पत्रांची छाननी व त्यावर निर्णय देणे - मंगळवार ६ जुलै (सकाळी ११ वाजतापासून)
- वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - मंगळवार ६ जुलै (छाननीनंतर लगेच)
- नामनिर्देशन पत्राविरोधात जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करणे - शुक्रवार ९ जुलै
- जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख - सोमवार १२ जुलै
- जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - सोमवार १२ जुलै
- उमेदवारी मागे घेणे (जेथे अपिल नाही तेथे) - सोमवार १२ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- उमेवारी मागे घेणे (जेथे अपिल आहे तेथे) - बुधवार १४ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप (अपिल नाही तेथे)- सोमवार १२ जुलै (दुपारी ३.३० नंतर)
- अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप (जेथे अपिल आहे तेथे) - बुधवार १४ जुलै (दुपारी ३.३० नंतर)
- मतदानाची तारीख - सोमवार १९ जुलै २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत)
- मतमोजणीची तारीख - मंगळवार २० जुलै (सकाळी १० पासून)
- निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे - शुक्रवार २३ जुलै पर्यंत राहिल.