अंबड ता प्रतिनिधी हारे
अंबड तालुक्यातील टाका ते चंदनापुरी - केकत जळगाव या रस्त्याची अतिवृष्टीमुळे मोठी दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.लोकप्रतीनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाक पणामुळे रस्त्याची वाट लागली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आला होता. या महापुराच्या पाण्याने या रस्त्यावरील मुरूम पूर्ण वाहून गेला आहे.या पूर्वी टाका ते चंदनापुरी रस्त्यावर २०१० साली टाका गावाजवळील नदीवरील पूल पहिल्याच पाण्यात वाहून गेला होता.त्यानंतर अद्याप पर्यंत हा पूल दुरुस्त करण्यात आला नाही. लघु पाटबंधारे विभागाला निवेदन देऊनही आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात पायीच काय पण बैल गाडी शेतात घेऊन जाणे शक्य नाही.आज ही या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी आहे.त्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना व मजुरांना दूरवरून काट्याकुपाट्यातील पाणंद रस्त्याने जावे लागत आहे. टाका-चंदनापुरी रस्ता असून अडचण तर नसून खोळंबा बनला आहे. आता तरी लोकप्रतिनिधींनी व संबंधित विभागाने रस्ता व पूल दुरुस्ती करावा अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.
