मलकापूर प्रतिनिधी
संतनगरी शेगाव येथे १ कोटी रुपयांच्या आम्रपाली भव्य बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला. या वास्तुमुळे विकसित शेगावच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.संपूर्ण मानव जातीचा विकास व्हावा हीच परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण आहे, त्याच विचारांचा प्रचार-प्रसार या भव्य वास्तूमधून व्हावा असे अध्यात्मिक उपक्रम हाती घ्यावे असे आवाहन यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले.
समाजात वितुष्ट निर्माण करण्यासाठी काही अदृश्य शक्ती कायम कार्यरत असतात, परंतु आपण सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. शेगावकर जनतेनी भाजपवर मोठा विश्वास ठेवत ४ पैकी ३ नगरसेवक हे मागासवर्गीय समाजाचे निवडून दिले आहेत, लोकांनी भाजपवर विश्वास ठेवला म्हणूनच शेगावच्या सर्वांगीण विकास करण्याची प्रेरणा मिळाली, भाजप पक्ष विकासावर लक्ष केंद्रित करणारा पक्ष आहे, सर्व जाती धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कायमच कटिबद्ध आहे .
त्याचप्रमाणे इंदिरा नगर येथील ६५लक्ष रुपयांच्या सभागृहाचे, तक्षशिला नगर येथील ३५ लक्ष रुपयांच्या सभागृहाचे, राजेश्वर नगर येथील ३५ लक्ष रुपयांच्या भव्य सभागृहाचे लोकार्पण केले. यावेळी शेगावच्या प्रथम नागरिक सौ.शकुंतलाताई बूच, उपनगराध्यक्ष सौ.सुषमा शेगोकार, शरद अग्रवाल, पांडुरंग बूच, नितीन शेगोकार,ज्ञानेश्वर साखरे, राजू अग्रवाल, प्रदीप सांगळे, डॉ.मोहन बानोले,विजय देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी- कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.