मोहम्मद असलम परवेज लोणार
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू व्हावी ही रास्त मागणी असून शिक्षकांना पेन्शन लागू व्हावी याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्य शालेय शिक्षण मंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले.
राज्य शासनाचे १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्या नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना बंद केली गेली आहे. पेन्शन मिळणे हे अधिकारच असून कर्मचारी व शिक्षक संघटनेची जुनी पेन्शन लागू व्हावी ही मागणी शासनस्तरावर पाठपुरावा करु. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावू, अशी ग्वाही पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी यावेळी दिली.
अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा आढावा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचित्रा पाटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, विठ्ठल पवार, श्रीराम पालकर, कल्पना राऊत व शिक्षक संघर्ष समितीचे सदस्य व शिक्षक उपस्थित होते.