मो. असलम परवेज लोणार: तालुका प्रतिनिधी
१३ फेब्रुवारी २०१३ पासून शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविलेल्यांकडील प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. सबंधितांना ६ जानेवारीपर्यंत प्रमाणपत्र जमा करणे अपेक्षित असतानाही अनेकांनी प्रमाणपत्र दिली नसून त्यांना आता १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. प्रमाणपत्र न देणाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचा संशय बळावला आहे.
पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षक होताना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्याची अट २०१३ पासून घातली गेली. तेव्हापासून तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात एकदाच शिक्षक भरती पार पडली. परंतु, शिक्षक भरती बंद असतानाही अनेकांनी विशेषत: खासगी शिक्षण संस्थांमध्ये नोकरीला लागलेल्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळविले. तर काहीजणांनी वशिलेबाजीतून थेट महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बनावट पध्दतीने प्रमाणपत्र मिळविली. प्रत्येक जिल्ह्यात अंदाजित सहाशे ते साडेसहाशेपर्यंत तसे शिक्षक असल्याचाही संशय आहे. या पार्श्वभूमीवर आता फेब्रुवारी २०१३ पासून जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील नियुक्त अथवा वैयक्तिक मान्यता, पदस्थापना दिलेल्या शिक्षकांकडील टीईटीचे मूळ प्रमाणपत्र जमा करून घेण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. आता त्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर कितीजण बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरीत दाखल झाले, ही बाब समोर येणार आहे.