असलम परवेज:लोणार
लोणार शहराला एक ज्वाज्वल्य विचारांनी समाजकारण व राजकारणास जोडणारे व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष खान मोमीन खान उर्फ खाना सेठ यांचे १३ नोव्हेंबर २०२२ च्या रात्री ९:२५ वाजता अल्पश्या आजाराने वयाच्या ७१व्या वर्षी त्यांच्या लोणार येथील राहत्या घरीच निधन झाले. लोणारकरावर जातीपातीच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन माणसावर अलोट प्रेम करणारा नेतृत्व हरपल्याची शोककळा पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता हजारो चाहतांच्या उपस्थितीत त्यांची दफनविधी संपन्न झाली.
खान मोमीन खान यांचा जन्म लोणार येथे सण १९५१ मध्ये झाला व राजकारणामध्ये सर्वप्रथम ते १९८५ साली ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून दाखल झाले. त्यानंतर १९८७ मध्ये लोणार नगरपालिकेची स्थापना झाल्याने नगरसेवक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. नंतर पाणीपुरवठा सभापती व विविध विभागामध्ये सभापती म्हणून त्यांनी यशस्वीरित्या आपली जबाबदारी पार पाडली व जनता मध्ये आपला ठसा उमटवला. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना तत्कालीन आमदार प्रतापराव जाधव यांनी ६ एप्रिल २००९ रोजी लोणार नगर परिषदेचे प्रथम मुस्लिम नगराध्यक्ष केले.
खाना सेठ स्पष्ट विचारांचे व्यक्तिमत्व होते, त्यामुळे सर्वधर्मीयांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाटत होते. त्यांच्या जाण्याने लोणारची कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने उत्तम संघटन कौशल्य असलेला व स्पष्ट विचारांचा नेता हरपला. ते गोर-गरिबांचे आधार होते. ३०-३५ वर्षांत केवळ चांगल्या कामांना पाठबळ देऊन त्यांनी गरिबांचा उद्धार केला.
लोणार शहर,तालुका व बुलढाणा जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवरांनी खाना सेठ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखामध्ये सामील झाले. एक झंजावती व्यक्तिमत्व म्हणून लोणारच्या राजकारणात व समाजकारणात त्यांचे मोठे स्थान होते. लोणारच्या विकासासाठी त्यांनी दिशा देऊन कायम मार्गदर्शन केले. मनाने प्रेमळ, स्वभावाने जिद्दी असलेले खाना सेठ पडद्याआड गेल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सर्व धर्मीयांचा मोठा सहभाग होता.
