"अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेची पदवीधर आ.धीरज लिंगाडे मार्फत शासनाला मागणी"
असलम परवेज
बुलढाणा- देशात शिक्षणाधिकार-२००९ कायदा लागू झालेला असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये गोरगरिबांच्या मुली/मुले शिकत असल्याने कोणत्याही कारणाने शिक्षक भरती मध्ये कपात करणे योग्य नाही. तरी राज्यातील एका ही शाळेत एक ही शिक्षकाचा पद रिक्त न ठेवता विद्यार्थ्यांना १००% शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांची १००% रिक्त पदे प्रथम प्राधान्याने भरण्याची मागणी संघटनेने केली आहे.
तसेच उर्दू माध्यमासाठी भरतीच्या वेळी एस.सी, एस.टी इत्यादी मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध नसल्यास ती पदे खुल्या प्रवर्गातून भरली जातात मात्र या साठी भरतीचा नवीन टप्पा घेतला जातो. असे न करता भरतीच्या पहिल्या टप्प्यातच एस.सी, एस.टी इत्यादी मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध नसलेल्या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी पवित्र प्रणालीत योग्य बदल करण्याची मागणीही संघटनेने या वेळी केली आहे.
मागील भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांकडून सर्व रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर न भरली गेल्याने नोकरी इच्छुक उमेदवारांवर अन्याय झाला होता. तरी विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकार नुसार १००% शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी पवित्र पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची सर्व रिक्त पदांची माहिती अपलोड करण्याचे सक्तीचे आदेश सर्व संस्थांना देण्याची विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे.
यावेळी निवेदन देतांना अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळात राज्यसचिव शेख जमीर रजा, जिल्हाध्यक्ष सय्यद अनीस, खाजगी जिल्हाध्यक्ष रईस काजी, कोषाध्यक्ष शारिक जुबैर, विभागीय सहसचिव रियाज अहमद, जिल्ह्याचे नेते हुसैन कुरेशी व शेख मोबीन, बिलाल देशमुख, मुनव्वर खान, मुज़म्मिल शाह उपस्थित होते.
