जितेश कारिया हिवरखेड प्रतिनीधी
भोवतालचं जग खूपच सुंदर आहे. त्याकडे आपण प्रेम किरण टाकले की झालं, ते जग तुमच्या कवेत येते ह्या अनुभूतीची ही वर्षभरापूर्वी घडलेलीली गोष्ट
काल पुन्हा तो शाळेत भेटला, जवळ आला, आमच्या गप्पा झाल्या, त्याच्या प्रगती बाबत वर्ग शिक्षिका सौ. सुरेखा हागे पण आनंदाने सांगत होत्या. त्याच्या सोबतची भेट, गप्पा अन निर्मळ बोलणं ऐकून मन आनंदून गेलं नि चित्रपटासारखा सर्रकन तो दिवस डोळ्यासमोर उभा राहिला. शाळेत निकालपत्रक, गुणपत्रक तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम करतांना दुपारचे बारा वाजून गेले.तितक्यात एक पालक व मुलगा शाळेत पहिलीत नाव दाखल करण्यासाठी आले. एकही मूल शाळाबाह्य राहायला नको म्हणून शाळेचा प्रयत्न असतो. शाळा पूर्व तयारी मेळावा घेतला होता तेव्हा ते पालक गावात नव्हते; म्हणून ते पालक आज शाळेत आले असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून समजले. ते पालक सहकारी शिक्षक निखिल गिऱ्हे व सौ. सुरेखा हागे यांच्याशी संवाद साधत होते. इकडे माझं निकाल पत्रक तयार करण्याचे काम सुरू होते पण लक्ष त्या तिघांच्या संवादाकडे होते. या संवादात पालकाचा सूर हा त्या सोबतच्या लेकराच्या शारीरिक कमकुवत अवस्थेवर टिपणी करणारा असल्याचे मी ऐकत होतो. तो फारच कमजोर आहे, आजारी असतो इथपासून ते इतर मुलांसोबत टिकणार नाही. त्याला इतकं काही येत नाही, यावर्षी त्याला शाळेत टाकायचे राहू द्या वगैरे वगैरे.
असं सारं ते पालक बोलत असतांनाच मी त्या लेकराला माझ्याकडे बोलावलं. त्याची माझी ही पहिलीच गाठभेट. मुळात नवख्या व्यक्तीसोबत लेकरं लवकर बोलत नसतात. तसंच शाळेत तर पहिल्या दिवशी लहान मुलं लवकर खुलत पण नसतात हा माझा अनुभव; परंतु हे मूल आंनदानं माझ्याशी बोलू लागलं. त्याच्याशी गप्पा मारतांना बौद्धिक, भावनिक, कौटुंबिक, भाषा विषयक विकास कितपत आहे हे मी सहज चाचपून पाहिलं. हे सारं त्या लेकराचे वडील बाप शांतपणे पाहत, ऐकत होते. चुरूचरू बोबडी उत्तरं देणाऱ्या आपल्या लेकराला बरंच काही येतं हे त्या पालकाने जेव्हा अनुभवलं तेव्हा तो बापमाणूसही आनंदला. शारीरिक विकास कमी वाटत असला तरी बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास हा त्याचा स्व गतीने होतोय हे जाणवल्यावर ते पालक त्या बालकाला शाळेत दाखल करायला तयार झाले. त्या बालकाचे नाव होते आरुष.
आरुष म्हणजे सूर्याचा पहिला किरण किती सुंदर नाव. सूर्याचे किरण जितके सजीव सृष्टीसाठी महत्वाचे तितकेच ज्ञानकिरण. जे त्याला देण्याची जबाबदारी आमच्या खंडाळा शाळेने घेतली होती.मध्यंतरी असंच शाळेत मी समोर हात केले तेव्हा तो सरळ कडेवरच आला होता. त्याच्या सोबत सेल्फी फोटो घेतला तेव्हा आंनदात स्माईल देत तो उभा राहिला होता. समोरच्या जीवावर प्रेम, स्नेहाची उधळण केली की, तो जीव आपल्यावर विश्वास ठेवतोच ठेवतो हा जगण्याचा वस्तूपाठ नि गती कमी जास्त असू शकते पण प्रत्येक मूल शिकू शकते हे आरुष मधील बदलाने पुन्हा एकदा कालच्या भेटीने अधोरेखित केलं जे आजीवन स्मरणात राहणारं आहे. तुळशिदास खिरोडकार

