हिवरखेड प्रतींनीधी जितेश कारीया
हिवरखेड ? कुठे आहे? काय महती या गावाची? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील.
हिवरखेड - ज्या गावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मनःपूर्वक योगदान देऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारला होता. सातपुडा पर्वतरांगाच्या जवळ परंतु पठारावर असलेलं हे गाव. स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतर अनेक वर्षं अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात यायचं. अकोट तालुक्याचे विभाजन होऊन पुढे हिवरखेड चा तेल्हारा तालुक्यात समावेश झाला. क्रांतिकारी विचारांची देण असलेल्या या गावच्या मातीत अनेक नररत्न जन्माला आले ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जिवंत ठेवली.
येथील देशभक्त माजी आमदार स्व. संपतराव भोपळे यांच्या राष्ट्रभक्तीने हिवरखेड ची ओळख स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीचे नेतृत्व करणारे नेते महात्मा गांधी यांच्या पासून विदर्भ केसरी स्व. ब्रिजलालजी बियाणी यांच्या पर्यंत होती. शालेय शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षे वयाच्या मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेक जण या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. त्यात महिलांचा सहभाग सुद्धा होता. वेगवेगळ्या इंग्रज राजवटीच्या विरोधात झालेल्या आंदोलनात येथील 41 स्वातंत्र्य सेनानी यांनी देशातील विविध कारागृहात शिक्षा भोगली. त्यामुळे तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांसोबत येथील तरुणांचा जवळचा संबंध आला. त्यातीलच एक आपल्या लेखणीने क्रांती घडवत स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी योगदान दिले असे राष्ट्रभक्त पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी.
आज साने गुरुजी यांचा स्मृतीदिन म्हणून एक जुनी आठवण ताजी झाली. त्यांचा आणि हिवरखेड येथील स्वातंत्र्य सैनिक शंकरराव आर्य यांचा संपर्क येरवडा जेल मध्ये आला होता. अकोला कारागृहातून शिक्षा भोगल्यानंतर शंकरराव आर्य
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत काम करत होते. पंडीत धर्मप्रकाश शिवशंकर नंदकिशोर राजपुत, गवळीपुरा नागपूर हे नाव धारण करून वेष बदलवून ते देशकार्य करायचे. पुण्याच्या आगाखान पॅलेस वर तिरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना कोर्टाच्या निकालानंतर 3 महिन्याची शिक्षा सप्टेंबर 1943 मध्ये सुनावण्यात आली होती. येरवडा कारागृहात त्यांना सश्रम कारावास भोगावा लागला होता. यावेळी त्यांना स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते पुज्य साने गुरुजी यांचे सानिध्य लाभले होते. साने गुरुजी यांनी कारावासात असताना निर्माण केलेले साहित्य लिहिण्याचे काम शंकरराव आर्य यांनी केले होते. त्यांचे अक्षर सुवाच्च असल्याने साने गुरुजी लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर द्यायचे. साने गुरुजी यांचे हे कारागृहात लिहिलेले सर्व साहित्य एका हिवरखेडकर राष्ट्रभक्ताने लिहून काढले याचा मोठा अभिमान वाटतो.
स्वातंत्र्याच्या अमृतकालाच्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारसाठी स्वातंत्र्य लढ्यातील कथा लिहित असताना स्वातंत्र्य सैनिक शंकरराव आर्य यांचे चिरंजीव उमेश आर्य यांनी ही घटना मला सांगितली होती. पूज्य साने गुरुजी यांचे जीवन म्हणजे चंदनाने झिजावं आणि त्याचा दरवळ आयुष्यभर इतरांना पुरावा असंच आहे. शाळेत शिकलेल्या त्यांच्या अर्थपूर्ण प्रार्थना, बोधपर कथा असो किंवा श्यामची आई ही कादंबरी सारेच मानवतेचा संस्कार करणारे साहित्य होते. ते कायमच आपल्यासाठी संस्कारांचे विद्यापीठ ठरले आहेत. आपल्या लेखणीतून क्रांती घडवत स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असेच आहे. या साहित्य लेखनात हिवरखेडच्या शंकरराव आर्य यांनी लावलेला हातभार सुद्धा तितकाच महत्त्वाचा वाटतो.
पूज्य राष्ट्रभक्त पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करत भावपूर्ण आदरांजली. ----तुळशिदास खिरोडकार
