Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हर्षदा जाधव यांचा पुसेगाव येथे जल्लोषात सत्कार; पहिला पगार श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी अर्पण करणार.

Responsive Ad Here



     बुध 

पुणे पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या हर्षदा जाधव यांचा पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रयत संघटना तसेच पुसेगाव पंचक्रोशीतील विविध गावांतील प्रमुख मान्यवरांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सत्कार करण्यात आला.हर्षदा जाधव यांचे वडील तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यासह त्यांचे पुसेगाव येथे आगमन होताच श्री सेवागिरी मंदिरासमोर फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी महंत सुंदरगिरी महाराज, पंचायत समिती सदस्या स्नेहल जाधव, देवस्थानचे विश्वस्त गौरव जाधव, सचिन देशमुख, बाजार समितीचे संचालक गणेश जाधव, संदीप जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हर्षदा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना हर्षदा जाधव म्हणाल्या, "खटाव-माण हा माझा माहेरचा मतदारसंघ असून, पाच जिल्ह्यांतून मला पदवीधर मतदारांनी भरभरून प्रेम देत विजयी केले. विशेष म्हणजे, निवडणुकीदरम्यान मी एकदाही या मतदारसंघाला भेट देऊ शकले नाही. तरीही येथील कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवसापर्यंत माझ्या विजयासाठी मनापासून मेहनत घेतली. त्यांच्या या योगदानाबद्दल मी सदैव ऋणी राहीन."त्या पुढे म्हणाल्या, "माझा मिळणारा पहिला पगार मी श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहे. माण-खटावच्या विकासासाठी प्राधान्याने काम करणार असून, यामध्ये तिळमात्र शंका नाही. आपण मतांच्या रूपाने माझ्यावर दाखवलेले प्रेम अविस्मरणीय आहे. ते मी कधीही विसरू शकणार नाही."

पुसेगाव येथे नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे वेळ वाढत गेला. सातारा जिल्ह्यात आल्यानंतर विविध ठिकाणी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आपण भारावून गेल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी केले, तर बाजार समितीचे संचालक गणेश  जाधव यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले.

या सत्कार समारंभास पुसेगावातील प्रदीप जाधव, युवा तरुण कार्यकर्ते, खातगुण येथील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विजय लावंड व त्यांचे सहकारी, विसापूर येथील ज्योती नाना सावंत व त्यांचे सहकारी, नेर येथील रोहन चव्हाण, दगडू दादा तसेच बुध, डिस्कळ, वर्धनगड, निढळ यांसह पुसेगाव पंचक्रोशीतील विविध गावांतील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षदा जाधव यांच्या विजयाचा आनंद आणि श्री सेवागिरी महाराजांप्रती व्यक्त केलेली श्रद्धा यामुळे पुसेगाव येथील हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.