Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगमुळे स्टार्टअप क्षेत्राला नवी दिशा मिळण्यासाठी उपक्रमाचे आयोजन

Responsive Ad Here

 

देऊळगाव राजा ( प्रतिनिधी) मनोहर खंदारे

दि.१२ ऑक्टोबर

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप क्षेत्राच्या विकासासाठी प्रभावी उपयोग होऊ शकतो, या उद्देशाने स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा आणि संत भगवानबाबा महाविद्यालय, सिंदखेड राजा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय अँड एमएल फॉर फ्युजन ऑफ इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेंटर’ या विषयावर एकदिवसीय बहुविद्याशाखीय राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळा पार पडली.

 महाविद्यालयाचा संगणकशास्त्र विभाग, इनक्युबेशन व स्टार्टअप केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य प्रा. डॉ. संतोष कुटे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात डॉ. कुटे यांनी आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ संगणक शास्त्रापुरती मर्यादित राहिलेली नसून कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य व बँकिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती घडवत आहे.

 महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात पिकांवरील रोग निदान, माती परीक्षण, हवामानाचा अंदाज व बाजारभाव विश्लेषणासाठी एआय-आधारित स्टार्टअप्स उभारण्याची मोठी संधी आहे, असे मत व्यक्त केले तसेच महाविद्यालयातील इनक्युबेशन केंद्रांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला डेटा-आधारित उद्योजकतेत रूपांतरित करण्याचे प्रभावी केंद्र बनले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. (डॉ.) ज्ञानेश्वर गोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत पारंपरिक शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांनी नोकरी शोधण्याऐवजी स्वतः नवउद्योजक बनावे, असा सल्ला दिला.

मार्गदर्शन सत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून संत भगवानबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वळसे यांनी सविस्तर सादरीकरण केले. स्टार्टअप्स ही केवळ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मक्तेदारी नसून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थीही कंटेंट क्रिएशन, डिजिटल मार्केटिंग, पर्यटन, भाषांतर, फिनटेक, जीएसटी व टॅक्सेशन सेवांमध्ये यशस्वी स्टार्टअप्स उभे करू शकतात, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

समारोपीय सत्रात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड येथील प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाची अचूकता, नैतिकता आणि समाजोपयोगी वापराचे महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी स्थानिक समस्या ओळखून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणारे व्यावसायिक बनावे, असा संदेश त्यांनी दिला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. रूपाली तेलगड यांनी केले. अतिथींचा परिचय आयक्यूएसी समन्वयक डॉ. एकनाथ भालेराव व डॉ. महेश तांदळे यांनी करून दिला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले - देशमुख यांनी, तर मार्गदर्शन सत्राचे संचालन प्रा. निलेश काकडे यांनी केले. समारोप सत्राचे सूत्रसंचालन व आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) अनंत आवटी यांनी केले.

श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव आणि प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वी झाली. आयोजनादरम्यान प्रा. पवन कदम व तांत्रिक चमूने परिश्रम घेतले. या राज्यस्तरीय कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी झाले होते.