कुस्ती व बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; पती काश्मीरमध्ये देशसेवेत, तर पत्नीची क्रीडा क्षेत्रात सुवर्णभरारी!
कुपवाड : प्रतिनिधी
सांगली पोलीस क्रीडांगणावर पार पडलेल्या ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत महिला पोलीस अंमलदार जयश्री तानाजी गडदे यांनी कुस्ती व बॉक्सिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदके पटकावत दुहेरी यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील ९०० हून अधिक पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत जयश्री गडदे यांनी कुस्तीच्या ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर बॉक्सिंगच्या ६५ किलो वजनी गटातही सुवर्णपदक मिळवत आपल्या क्रीडाकौशल्याची छाप पाडली.
विशेष म्हणजे, जयश्री गडदे यांनी यापूर्वी पंजाब व उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धांपर्यंत मजल मारली आहे. पोलीस दलातील जबाबदारी, कौटुंबिक कर्तव्ये आणि दोन मुलांचे संगोपन सांभाळत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील आपली जिद्द कायम ठेवली आहे. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जयश्री गडदे यांचे पती राहुल रमेश घागरे हे भारतीय सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत असून, सध्या जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे पती देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर आपली जबाबदारी पार पाडत असताना दुसरीकडे पत्नी पोलीस दलातील कर्तव्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सुवर्णयश मिळवत आहे. दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सांभाळत जयश्री गडदे यांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत सुवर्णपदके पटकावून जयश्री गडदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्या या दुहेरी सुवर्णयशाबद्दल क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन होत आहे.
पती देशाच्या सेवेत, पत्नीची सुवर्णपदकांना गवसणी!
पती राहुल रमेश घागरे हे भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत, तर पत्नी जयश्री गडदे पोलीस दलात सेवा बजावत क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. दोन मुलांची आई असतानाही कुस्ती आणि बॉक्सिंगसारख्या क्रीडा प्रकारांत दुहेरी सुवर्णपदक पटकावून त्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. एकीकडे देशसेवेचा अभिमान, तर दुसरीकडे क्रीडा क्षेत्रातील सुवर्णयश, अशी या कुटुंबाची प्रेरणादायी वाटचाल ठरत आहे.
