सुरज कोडापे : सिन्देवाही प्रतिनिधी
14. 10.2026 बुधवार
नदीघाटावरून रेतीची वाहतूक सुरू असल्याची चर्चा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गाव परिसरात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात येत असून, संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नदीघाटावरून ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीची वाहतूक होत असल्याची चर्चा असून, या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ट्रॅक्टर मालकांची मनमानी सुरू असल्याचा आरोप
गडबोरी परिसरातील नदीघाटावर रेतीचे उत्खनन आणि वाहतूक नियमानुसार होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ट्रॅक्टर मालकांकडून मनमानी पद्धतीने रेतीची वाहतूक होत असल्याचा आरोप असून, संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष की देखरेखीचा अभाव?
नदीघाटावर सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या रेती वाहतुकीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे का? वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या आहेत का? नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई का होत नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
रेतीच्या अवैध उत्खननामुळे नदीपात्र आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता महसूल विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या कारवाईकडे!
गडबोरी नदीघाट परिसरातील रेती उत्खनन आणि वाहतुकीची निष्पक्ष चौकशी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन प्रत्यक्ष चौकशी करणार का? की रेती वाहतुकीबाबतचे प्रश्न अनुत्तरितच राहणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
