Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री शिवाजी महाविद्यालयात कृषी आधारित उद्योजकता विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप संपन्न!!

Responsive Ad Here




युवकांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी देणारे उद्योजक बनावे – प्रा. डॉ. सतीश रिंढे

मन्सूर शहा धोत्रा.भ.:-----चिखली 

 श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘कृषी आधारित उद्योजकता विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा’ समारोपीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते पुष्पाई फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेलसूरचे संचालक तसेच लक्ष्मी इंडस्ट्रीज, एमआयडीसी चिखलीचे प्रोप्रायटर प्रा. डॉ. सतीश रिंढे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सतीश रिंढे यांनी कृषी आधारित उद्योजकता विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वयंरोजगाराला चालना देणारा महत्त्वपूर्ण व दिशादर्शक अभ्यासक्रम असल्याचे सांगितले. पारंपरिक पद्धतीने केवळ शेती उत्पादन घेण्याऐवजी शेतीकडे एक फायदेशीर व्यावसायिक उद्योग म्हणून पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि विपणन या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक आणि महिलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतः उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. युवकांनी ‘नोकरी शोधणारे’ (Job Seeker) न बनता ‘नोकरी देणारे’ (Job Creator) बनण्याची मानसिकता विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आणि त्यांच्या माध्यमातून सामूहिक शेती, पुरवठा साखळी व्यवस्थापन (Supply Chain Management) व थेट विक्री यांसारख्या संकल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून आकर्षक पॅकिंग व ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. यामुळे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांनी शासनाच्या SMART, MAGNET तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) यांसारख्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन कृषी उद्योजकतेसाठी उपलब्ध असलेल्या संधी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी यशस्वी कृषी उद्योजक (Agri-preneur) बनून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाला प्रा. पुरुषोत्तम पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनीता कलाखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. चैतन्य बागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहन देव्हारे यांनी केले. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांमध्ये कृषी उद्योजकतेची जाणीव निर्माण करून त्यांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधींची दिशा देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरला. आहे .