हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण भारतात वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्त्याने सामान्य जनतेला वन व वन्यजीव याविषयी संवेदना जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे जसे की रॅली, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव क्षेत्रांमध्ये भटकंती, तसेच इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वन्यजीव सप्ताह 2020 साजरा करताना कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे जरी सार्वजनिक स्तरावर वन्यजीव सप्ताह साजरा करण्यास अडचणी असल्या तरी विविध वेबिनार, समाज माध्यमे द्वारा जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. अशी माहिती वन अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांनी दिली.
वन्यजीव सप्ताह साजरा करण्याची सुरुवात 1952 साली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या पुढाकाराने वन्यजीव संरक्षण आणि वन्यजीवन विषयी जागृती करण्याच्या दृष्टीने केली. भारत देश हा जगातील मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेला देश आहे. लुप्तप्राय असणाऱ्या अनेक प्रजाती भारतातील वनांमध्ये वास्तव्यास आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतातील वने व वन्यजीवांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर कार्य हाती घेण्यात आले. वन्यजीव सप्ताहाची सुरुवात झाल्यानंतर लुप्तप्राय असणाऱ्या अनेक प्रजातींच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ व्हायला सुरुवात झाली. वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्यात आली. एकेकाळी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या शिकारीमुळे लाखाच्या घरात असणारी रॉयल बेंगाल टायगर ही वाघाची प्रजाती लुप्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सन 1973 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्प योजनेअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांची घोषणा केली. त्यानुसार सुरुवातीला नऊ व्याघ्र प्रकल्पांची स्थापना देशभरात करण्यात आली. आजच्या घडीला भारतात पन्नास व्याघ्र प्रकल्पमध्ये 2967 वाघ अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर एकूण 104 राष्ट्रीय उद्याने आणि 551 वन्यजीव अभयारण्यांमध्ये वाघ, बिबट, तडस, रानकुत्री,हिमबिबट इत्यादी मांसाहारी प्राणी तसेच सांबर, ठिपक्याचे हरीण, काळवीट, बारासिंघा, चौसिंघा, रानगवे, अस्वल, इत्यादी तृणभक्षी प्राणी, हजारो पक्षी, सर्व प्रजाती, कीटक प्रजाती, सुखनैव नांदत आहेत.
आज घडीला मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत असल्यामुळे रेल्वे लाईन, विद्युत वाहिन्या, विविध खाणी, याकरिता वन जमिनी हस्तांतरित केल्या जात आहेत. त्यामुळे वन्यजीवा करीताचे क्षेत्र आक्रसत चालले असून मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले आहेत. वन्यजीव विभागाकडून वन्य-प्राणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या वाढत चालली आहे. परंतु वाढणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संख्येला सामावून घेतील अशी दर्जेदार वने आक्रसत चालली आहेत. वाघ, बिबट्या, सारखे वन्यप्राणी आपापल्या ठराविक क्षेत्रात वावरतात. त्यानुसार वाढलेल्या वाघांची संख्या ही त्या प्रमाणात दर्जेदार वने उपलब्ध असतील तरच वाढू शकते. अन्यथा वाघ वनक्षेत्रा बाहेर पडून मानव-वन्यजीव संघर्ष या पुढील काळात आणखी वाढत जाणार आहे. त्याकरिता आहेत या संरक्षित वनांचे संरक्षण, संरक्षित वनांच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे, त्यानुसार वन संरक्षणाचा दर्जा वाढविणे, इत्यादी उपाय पुढील काळात करणे ही काळाची गरज आहे.
यामध्ये सर्व नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करणे, वने व वन्यजीव यासंबंधी त्यांना संवेदनशील बनविणे, वने व वन्यजीव यावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे हे नवीन पिढीला सतत बिंबवत राहणे हेच वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागचा शासनाचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती नरनाळा वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण, (महाराष्ट्र वनसेवा) मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांनी आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली आहे.