४ वर्षांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी घेतले होते दत्तक ग्राम टिमटाळा
तक्रारी, निवेदने व प्रसारमाध्यमांच्या प्रसिद्धी नंतर प्रशासनाला आली जाग
पापड दी.१९ (प्रतिनिधी)- चार वर्षांपूर्वी खासदार दत्तक ग्राम योजनेद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. पियुशजी गोयल यांनी दत्तक घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या टीमटाळा या इतिहासकालीन लोप पावलेल्या गावाचा शंभर वर्षानंतर कायापालट होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की, जगप्रसिद्ध कन्याकुमारी शिलास्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथजी रानडे यांचा जन्म टीमटाळा या छोट्याशा गावी १९ नोव्हेबर १९१४ रोजी टीमटाळा रेल्वेस्टेशन वर स्टेशन मास्टर पदावर कार्यरत असलेल्या रामकृष्ण विनायकराव रानडे व रमाबाई रामकृष्ण रानडे यांच्या पोटी झाला होता. तद्नंतर उच्च शिक्षण व राष्ट्र सेवेचा ध्यास बाळगत रानडे परिवाराने आपल्या जन्मगावापासून निरोप घेतला. जन्मभूमि चे ऋण फेडण्यासाठी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाच्या ऐतिहासिक वास्तूवर सिंहाचा वाटा उचलनारे एकनाथजी रानडे यांनी आपल्या जन्मभूमि चे नाव कोरून जग प्रसिध्द केले. मात्र कित्येक दशकांपासून टीमटाळा हे गाव उपेक्षितच होते. गावात आरोग्यसेवा, रस्ते, पाणी, वीज, रोजगारनिर्मिती नसतांना टीमटाळा गावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. कित्येक दशकांपासून होत असलेल्या या समस्येवर उपाय म्हणून गावातीलच विद्यार्थी युवा सुरज सहारे यांनी गावातील काही वरिष्ठ मंडळींना सोबत घेवून प्रसार माध्यमे, तक्रारी, निवेदने देऊन गावाचे नाव प्रकाशझोतात आणले. सोबतच २०१६ मध्ये भाजपा चे आत्ताचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मा. शिवराय जी कुलकर्णी साहेब यांच्या मदतीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासदार दत्तक ग्राम योजनेद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री मा. पीयुशजी गोयल साहेबांना विनंती करत आदर्श दत्तक ग्राम करून घेतले.
त्यानंतर महिन्याभरात गावातील कामांची यादी गावकऱ्यांनी गोयल साहेबांना प्रत्यक्षात देवून त्वरीत विकासकामे करण्याचा आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात आला. साहेबांच्या हाकेला प्रतिसाद देत प्रशासनाने कामे मंजूर केली. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी निवेदने ,तक्रारी प्रशासनास सादर करून विकासकामे तात्काळ सुरू करण्याची विनंती केली.
त्याच अनुषंगाने का होईना, टीमटाळा येथील ग्राम सचिवालय पूर्णंत्वास येवून त्याठिकाणी लाखो रुपये किमतीचे युटीलीटी सेंटर उभारले. जेणेकरून बँक, आरोग्य, महसूल संदर्भातील कामे एकाच जागी स्थिर राहून परिसरातील ग्रामस्थांना सोयीचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोबतच लग्न, वाढदिवस यांसारख्याकार्यक्रमप्रसंगी सभागृहाची स्थापना सुद्धा करण्यात आली. गावातील अंतर्गत रस्त्यांना वेग येवून सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे शेती व्यवसाय, पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीवर लघुसिंचन प्रकल्पाचे काम झपाट्याने होत असून अल्पावधीतच तेही काम पूर्णत्वास येणार आहे.या धरणाचे काम पूर्णत्वास झाल्यानंतर त्यामध्ये एकनाथजिंचे स्मारक तसेच त्यांच्या विचारांचे स्मृतीवन निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
जेणकरून शेतकऱ्यांना व परिसरातील ग्रामस्थांना वरदान ठरणार आहे. एकंदरीतच शेकडो वर्षांपासून लोप पावत असलेल्या कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शीला स्मारकाचे शिल्पकार मा. एकनाथजी रानडे यांच्या जन्मगावाचा कायापालट होतानाचे चित्र पाहावयास मिळत असल्याची माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी दिली आहे.

