गणेश शेवाळे प्रतिनिधी सेलू
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीच्या कालावधीमध्ये वाढ केली असून सोमवारी (दि.पाच एप्रिल) सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी कायम असणार असल्याचे बुधवारी (दि.31) दुपारी काढलेल्या आदेशात त्यांनी नमूद केले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाची ती साखळी तुटावी म्हणून उपाययोजनांचा एक भाग म्हणून गुरुवारी (दि.एक) सकाळी सहापर्यंत यापुर्वी संचारबंदी लागू केली होती. मात्र, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने संचारबंदी कालावधीत त्यांनी वाढ केली असून ती पाच एप्रिल (सोमवार) सकाळी सहा वाजेपर्यंत असणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ज्या बाबींना, अस्थापनांना, अत्यावश्यक बाबींना या कार्यालयाने सूट दिली आहे, त्या अस्थापना सुरू राहतील, ज्या अस्थापना, दुकान यांना सूट दिली नाही ती बंद राहतील. तसेच यापुर्वी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे.