प्रदिप रघुते येनस
कविता
"तूच होतीस ना ती...
आदामाच्या कुशीतून जिला देवानं बनविलं
आणि सैतानाच्या मोहाला बळी पडून
जगातील पहिलं वहिलं पाप करणारी
पण जिनं त्या ख्रिस्ताला जन्म दिला
ज्यानं सर्वावर प्रेम करायला शिकवलं
अगदी क्रूसावर मारल्यानंतर सुद्धा.......
त्या ख्रिस्ताला जन्म देणारीसुद्धा तूच होतीस....
तुला बघितलय मी शिवाजी राजांवर संस्कार करतांना
स्वराज्याच स्वप्न त्यांच्या डोळ्यात भरतांना.
होय तुला बघितल मी दुर्बल होऊन सती होतांना.
अन् यमाशी भांडून सत्यवाणाचे प्राण परत आणताना.
तुला बघितलय मी रामायण महाभारताच कारण बनताना.
उपाशी पिल्लांच्या चोचीत प्रेमाने दाने भरतांना.
तुला बघतोय मी वासनेच्या खोट्या प्रेमाला बळी पडताना,
खोट्या प्रेमाचं नाटक करून खऱ्या प्रेमाला ठोकर मारतांना.
तुला बघतोय मी घरकाम करताना, चिडचिड करतांना
थकल्यानंतरही घरातील सर्वांना सावरतांना,
तुला बघितलय सप्तसुरांची उधळण करतांना अन्
राग आल्यावर शिव्याशापांची लाखोली वाहतांना.
तुला बघितलय मी पैशासाठी शील विकतांना,
सीतेसारखं पवित्र असून पदोपदी अग्नीपरीक्षा देतांना.
तुला बघितलय मी आठ आण्यासाठी घासाघीस करतांना,
४०० रूपयांची साडी ४००० ची सांगून मिरवतांना.
तुला पाहिलं मी ऑस्कर पटकावतांना, मिस वर्ल्ड बनतांना,
अन् स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेत असह्य अपमान सहन करताना.
तुला पाहिलयं बांबाकडून आपला हट्ट पुरवून घेतांना,
राष्ट्रपती होवून या देशाची धुरा सांभाळतांना.
तुला पाहिलं मी झाशी वाचविण्यासाठी इंग्रजाशी दोन हात करतांना,
दिन दुबळ्यांची सेवा करून मदर टेरेसा होतांना.
तुला पुजतांनाही पाहिल आणि भाजतांनाही,
माया लावतांनाही पाहिल अन् मानवी बाँम्ब होतानाही
येवढ्या सर्व रंगात खरंच,
"तूच होतीस ना ती ? "
सहा. प्रा. श्री. राजीव ज. तायडे
विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर.
मो.नं.918668956754
