प्रदीप रघुत प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर
मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत पॉवर ऑफ मीडियाचे निवेदन
अमरावती : पत्रकार हा देशाचा कणा आहे. पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. असे जरी म्हटले जात असले तरी भारतीय पत्रकार क्षेत्रांमध्ये काम करणारा ग्रामीण व शहरी पत्रकार आज सुद्धा शासकीय योजनांपासून वंचित राहिलेला आपल्याला नेहमी दिसतो आहे. शासन नेहमी पत्रकार बातमीदार ग्रामीण बातमीदार आणि वार्ताहर याच्या तोंडाला नेहमीच पाने पुसताना दिसतो. सरसकट पत्रकारांना ते ग्रामीण असो शहरी असो अधिस्वीकृत असो किंवा नसो सर्वांनी कोरोना पार्श्वसभूमीवर लॉक डाऊन मध्ये सुद्धा अठरा-अठरा तास प्रत्येक वार्ताहराने, पत्रकाराने, मिडिया प्रतिनिधीने व बातमीदाराने मेहनत घेतलेली आहे.
देशभरामध्ये पावर ऑफ मीडिया हि पत्रकार संघटना कार्यरत आहे. या संघटनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची एकच मागणी आहे, ती म्हणजे पत्रकारांची वार्ताहरांची, प्रतिनिधींची शासन दरबारी नोंद व्हावी. मात्र अद्यापही शासन याबाबतीत उदासीन दिसून येते. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 38 वर्षीय तरुण पत्रकार ऋषिकेश वाघमारे यांचे covid-19 मुळे अमरावती येथील कोविड रुग्णालयामध्ये निधन झाले होते. त्यांचे वय फक्त 38 वर्षे इतके होते. त्यांचे पश्चात आई ,त्यांच्या दोन लहान मुली आणि गर्भवती पत्नी असा आप्त परिवार आहे. ऋषिकेश वाघमारे यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ नाही. मात्र आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून फक्त पत्रकारीतेचा ध्यास घेतला होता. पत्रकारिते शिवाय दुसरे कोणतेही कार्य न केल्यामुळे ते सर्वत्र प्रख्यात होते 24 तास कामावर असणारा पत्रकार अशी त्यांची ख्याती होती. ते मूळचे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार येथील रहिवासी होते. 6 एप्रिल 2021 चे पहाटे 4 वाजता कोरोनाच्या उपचारादरम्यान अमरावती येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर नव्हे तर संपूर्ण पत्रकार जगतावर फार मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या पत्नी वर आलेली आहे. शासनातर्फे कोरोना काळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांना विमा देण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शासनाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीरपणे वक्तव्य केले आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण पत्रकार असलेले ऋषिकेश वाघमारे यांच्या कुटुंबाला 50 लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर, उपाध्यक्ष महादेव चव्हाण, सचिव अनिल कदम यांच्या आदेशावरून पॉवर ऑफ मीडिया अमरावतीच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. 12 एप्रिल रोजी निवेदन देतेवेळी पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड, पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे, पॉवर ऑफ मीडियाचे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर, डॉ कुशल लोटे, अमरावती जिल्हाअध्यक्ष उमेश लोटे, अमरावती महानगर अध्यक्ष सुधीर गणवीर, उपाध्यक्ष प्रवीण शेगोकार, पवन श्रीवास्तव यांचेसह ग्रामीण सचिव मीनाक्षी करवाडे उपस्थित होते. यावेळी या निवेदनाला सकारात्मक उत्तर देताना निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी लवकरच आपण माहिती घेऊन पत्रकारांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे सकारात्मक विचार त्यांनी व्यक्त केले.
