भीमराव हारे प्रतिनिधी अंबड
राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून शांततेत लढा देणाऱ्या साष्टपिंपळगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.या निर्णयाच्या निषेधार्थ धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील पैठण फाटा येथे सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी मराठा आंदोलकांनी कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावरून उठणार नाही.असा आक्रमक पवित्रा घेतल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.यावेळी १५ ते २० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल,तहसीलदार सी.एफ. मिरासे,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पाटील,पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे,तलाठी कृष्णा मुजगुले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तत्पूर्वी साष्ट पिंपळगाव ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत १० किलोमीटर अंतर चालत ३०० ते ४०० मराठा आंदोलकांनी पदयात्रा काढून राष्ट्रीय महामार्गाकडे कूच केली.मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.आज या आंदोलनाचा १०८ वा दिवस आहे.यावेळी शांततेत लढा देणाऱ्या साष्टपिंपळगाव ग्रामस्थांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यामुळे निर्णयामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला.
त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला.पदयात्रा काढत मराठा आंदोलकांनी महामार्गाकडे चाल केली.चालता चालता सुमारे तीन चारशे आंदोलक महामार्गावर ठिय्या धरून बसले.या सर्व प्रकारामुळे पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची भंबेरी उडाली.याठिकाणी दंगल नियंत्रण पथक,दामिनी पथक व गोंदी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता.
यावेळी मनोज जंरागे,संजय कटारे,शहादेव औटे,गणेश बोचरे,राजेश तांबडे,सुदर्शन कासुळे,अशोक औटे,सतिष बोचरे,रंजना औटे, कौशल्या जाधव, उषाबाई सुळे, कुसुम पैठणे,दत्तात्रय कासुळे ,तुकाराम वैद्य,संतोष ढवळे, औटे,बाबासाहेब वैद्य ,संभाजी पैठणे,रावसाहेब सुळे ,मुक्ताबाई ढेपे ,रूख्मिनबाई निकम, कमलबाई जाधव ,जिजाबाई संकुडे,राजुबाई जाधव यांच्यासह शेकडो मराठा आंदोलक उपस्थित होते.
प्रतिक्रिया
‘गेल्या ३९ वर्षांपासून मराठा समाज झगडत आहे.आज सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या विरोधात जो निकाल लागला आहे.त्याला फक्त आणि फक्त अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.त्यांनीच मराठ्यांचा घात केला आहे.आमची बाजू मांडण्यात ते कमी पडले.मात्र आता आम्ही शांत बसणार नाही.रस्त्यावर उतरून लढा उभारण्याची वेळ आली आहे....मनोज जरांगे,मराठा आंदोलक
