प्रतिनिधी:-हिवरखेड जितेश कारीया
आदर्श पत्रकार संघासह विविध स्तरावरील सामूहिक पाठपुराव्याला यश
अकोट-अकोला- पूर्णा आणि पूर्णा अकोला अकोट ही दररोज धावणारी डेमो ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.अकोट पूर्णा दररोज धावणाऱ्या डेमू ट्रेन चा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादच्या टाईम टेबल मध्ये नांदेड विभागात ह्या गाडीचा समावेश केला आहे. अकोला-अकोट-हिवरखेड-खंडवा या रेल्वे मार्गावरील वाहतूक मागील पाच वर्षापासून बंद आहे दिनांक 1 जानेवारी 2017 पासून हा मार्ग गेज परिवर्तन करण्यासाठी बंद करण्यात आला होता.
उपरोक्त मार्गांपैकी फक्त अकोला ते अकोट मार्गाचेच गेज कन्वर्जन पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होऊन दोन वर्ष लोटत आले तरी अकोट येथून प्रवासी रेल्वे अजून पावतो सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, काही लोकप्रतिनिधी, अनेक रेल्वेप्रेमी नागरिकांकडून अकोट येथून रेल्वे सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.
आदर्श पत्रकार संघ हिवरखेड आणि हिवरखेड विकास मंच तर्फे सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज संदीप इंगळे, राजेश पांडव, सुरज चौबे, जितेश कारिया, राहुल गिऱ्हे, अर्जुन खिरोडकार, अनिल कवळकार, यांनी निवेदनाद्वारे दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद चे महाप्रबंधक श्री गजानन माल्ल्या यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अकोट येथून रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती.
शोएब वासेसा, सै रियाज अली, विजय जितकर, गुलाटी, अमोल डोईफोडे, अमोल इंगळे, राकेश भट्ट, प्रकाश नकथमल शर्मा, गजानन राऊत यांचेसह अनेक रेल्वेप्रेमी नागरिक आग्रही होते. हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री गजानन माल्या यांच्याशी चर्चा करून अकोट वरून रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आणि अकोट हिवरखेड खंडवा रेल्वे मार्गचे काम सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. अकोट येथून तात्काळ रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन श्री माल्या यांनी धिरज बजाज यांना दिले होते.
नवीन टाईम टेबल नुसार पूर्णा अकोला अकोट हि डेमो गाडी दररोज सकाळी सात वाजता पूर्णा येथून निघेल आणि दुपारी पावणे दोन वाजता अकोट येथे पोहोचेल. तसेच परतीला दररोज दुपारी दोन वाजता अकोट येथून हि रेल्वे निघेल आणि रात्री साडेआठ वाजता पूर्णा येथे पोहोचेल. या गाडीची धावण्याची वेळ जरी निश्चित झाली असली तरी ही गाडी कोणत्या तारखेपासून सुरू होईल ती तारीख निश्चित झालेली नाही. परंतु येत्या काही दिवसातच ही गाडी धावणार एवढे मात्र निश्चित आहे. सध्या अकोट येथून एकच गाडी धावणे सुरू होईल. परंतु टप्प्याटप्प्याने अकोट येथून विविध ठिकाणी धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल असे जाणकारांचे मत आहे. अकोट येथून प्रवासी रेल्वे सुरू करण्यात येत असल्यामुळे सर्व रेल्वे प्रेमी नागरिकांतर्फे दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन माल्ल्या यांच्यासह सर्व वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
