प्रतिनिधि हिवरखेड: जितेश कारीया
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गोर्धा, सौंदळा सोनवाडी बादखेड हिंगणी बु,येथील शेतकरी गटाच्या प्रशिक्षणाचे आयोजन हिंगणी बु येथे सचिन कोरडे यांच्या शेतामध्ये करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाकारिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषि अधिकारी तेल्हारा मिलिंद वानखेडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पबाबत विस्तृत माहिती विवेक मानकर अकोला जिल्हा मनुष्यबळ विकास व्यवस्थापक (पोकरा प्रकल्प )यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. प्रशिक्षणामध्ये अकोला जिल्हा गटशेती व कृषि आधारित प्रकल्प संयोजक नोगेश ठाकरे यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पमधून शेतकरी गटाकरिता असणाऱ्या विविध योजना, गट स्थापन करणे,प्रकल्प आराखडा तयार करणे, यांत्रिकरनामध्ये अवजारे बँक स्थापन करणे आणि इतर विविध विषयावर मार्गदर्शन करून शेतकरी गटांच्या समस्याचे निराकरण केले.
या प्रशिक्षणामध्ये हवामानानुसार बदलती शेतीपद्धती, शेतीसोबतच जोडव्यवसायाची गरज आणि कृषि मूल्यवर्धनाचे महत्व याबाबत शेतकऱ्याशी तालुका कृषि अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी संवाद साधला.
याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे कृषि संजीवनी सप्ताह मध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अमरावती विभागमधून उत्कृष्ट कृषि सहाय्यक म्हणून तेल्हारा तालुक्यातील मनोजकुमार सारभुकन यांचा सत्कार करण्यात आला होता.त्यामुळे तेल्हारा तालुक्याचा राज्यस्थरावर नावलौकिक वाढविल्याबद्दल हिंगणी येथील शेतकरी बांधवाकडून तेल्हारा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण टीम चे गावाकऱ्याच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तालुका कृषि अधिकारी मिलिंद वानखेडे यांचा सत्कार हिंगणी येथील युवा प्रगतीशील शेतकरी सचिन कोरडे यांनी केला तर उत्कृष्ट कृषि सहाय्यक मनोजकुमार सारभुकन यांचा सत्कार मंगेश कोरडे यांनी केला. तसेच इतर मान्यवर यांचे सत्कार शेतकरी गटातील सदस्यांनी केले.
सदर कार्यक्रमाला मंडळ कृषि अधिकारी हिवरखेड गौरव राऊत, मंडळ कृषि अधिकारी तेल्हारा उमेश कदम, मंडळ कृषि अधिकारी अडसूळ नरेंद्र राठोड यांच्यासह कृषि पर्यवेक्षक गजानन नागे कृषि सहाय्यक महेश इंगळे, प्रदीप तिवाले, उमेश डांगे, केशव सरनाईक आणि शेतकरी बांधवाची उपस्थिती होती सदर प्रशिक्षणाचे व्यवस्थापन हिंगणी बु येथील शेतकरी गटामार्फत करण्यात आले होते.
