हिवरखेड:-जितेश कारीया
आ. अमोल मिटकरी यांच्या निधीतून रुग्णवाहिकेसाठी सव्वा अकरा लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता
रुग्णवाहिकेअभावी अनेक रुग्णांना गमवावा लागला होता जीव
हिवरखेड हि विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे आणि हिवरखेडला शेकडो खेडी लागू असल्याने हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कमीत कमी 2 रुग्णवाहिकांची नितांत आवश्यकता आहे परंतु येथे असलेली 108 रुग्णवाहिका सुद्धा कोविड सेवेसाठी अकोला येथे पळविण्यात आली होती. त्यामुळे रुग्णवाहिके अभावी अनेक रुग्णांना आपल्या जिवाला मुकावे लागल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने रुग्णवाहिका अत्यावश्यक असल्याबाबत अनेकदा वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित झाले होते. हिवरखेड विकास मंच, आदर्श पत्रकार संघ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ इत्यादींसह सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, संदीप इंगळे, राहुल गिऱ्हे, सुरज चौबे, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, जावेद खान, उमर बेग, अनिल कवळकार, राजेश पांडव डॉ आनंद भराटे, डॉ स्नेहा सावंग आणि अनेक जागरूक नागरिकांनी हा मुद्दा सातत्याने रेटून धरला होता. याबाबत तथाकथित विकास महर्षी लोकप्रतिनिधीनी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र दिसत असल्याने आणि त्यांच्याकडून जनतेचा अपेक्षाभंग झालेला असल्याने हिवरखेड विकास मंच, आदर्श पत्रकार संघ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ इत्यादींच्या माध्यमातून विधानपरिषदचे कर्तव्यदक्ष आमदार अमोल मिटकरी यांना याबाबत साकडे घालण्यात आले होते.
हिवरखेड वासीयांच्या व्यथा लक्षात घेऊन आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. आमदार मिटकरी यांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत हिवरखेड येथील "वारकरी रूग्णवाहिका" साठी 11,27,750 रुपयांचा निधी दिला. त्याला आता जिल्हाधिकारी यांचेकडून प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. तसे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे "वारकरी रूग्णवाहिका" दाखल होणार असल्याची माहिती आमदार मिटकरी यांच्या कार्यालयातून सामाजिक कार्यकर्ते धीरज बजाज यांना देण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
रुग्णवाहिकेच्या अभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये म्हणून हिवरखेड येथे माझ्या विकास निधीतून "वारकरी रुग्णवाहिका" उपलब्ध करून देण्यात येणार आहे._अमोल मिटकरी, आमदार विधानपरिषद.
