प्रतिनिधी चिखली
चिखली :शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर काल १६ नोव्हेंबरला रात्री ९ .४५ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोघा दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट ( ५५ ) वर्ष यांचा मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चिखली पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी दाखल झाले आणि तातडीने पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांनी मंगळवारी रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाचे मुख्य शटर बंद केले. परंतु, बाजूचे लहान शटर उघडे असतांना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले. त्यातील दोघे जण ग्राहक बनून दुकानात शिरले व त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने हल्ला केला. या झटापटीत ते दरोडेखोर रोख रक्कम लुटून फरार झाले. कमलेश पोपट यांनी तश्याच जखमी अवस्थेत आपल्या मोबाईल फोनद्वारे कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान दुकाना समोरून जाणारे एका मुलाने त्यांना जमीनीवर तडफडतांना पाहून दुकानात धाव घेतली. या मुलाने त्यांच्या घरी घडलेली घटना फोनवरून कळवली. त्यानंतर लगेचच कमलेश पोपट यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलिस करत आहेत