भीमराव चाटे प्रतिनिधी दे राजा
विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शाळेचे ऋण
03 जुलै 1934 रोजी स्थापन झालेल्या देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित शाळांपैकी एक ! या शाळेत वर्ग 5 ते 12 वी पर्यंत तब्बल 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा तथा इतर अनुषंगिक परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवत असतात. सोबतच वर्ग 10 वी 12 वी चा वार्षिक परीक्षेचा निकाल सुद्धा विक्रमी असतो.हे विशेष ! इथलं व्यवस्थापन तथा शालेय प्रशासन सूत्रबद्ध असल्याने तथा शिक्षक वृंद स्वयंस्फूर्तपणे नाविन्यपूर्ण अध्यापन करत असल्याने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची जडणघडण होते.त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी जीवनाची पायाभरणी होते.ही वस्तुस्थिती.
पोषक शैक्षणिक वातावरण, नाविन्यपूर्ण अध्यापन तसेच विद्यार्थ्यांना सदोदित प्रेरित ठेवण्याची इथल्या शिक्षकांची विशेष हातोटी यामुळे इथले विद्यार्थी नेहमीच यशाची शिखरे काबीज करत असतात.ही या शाळेसाठी व या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गौरवाची बाब.
नुकतेच ग्राम शिराळा व ग्राम पोखरी या दोन छोट्याशा गावातील रवींद्र सरडे व शिवहरी चव्हाण या अतिशय प्रामाणिक, अभ्यासू,वक्तशीर,शिस्तप्रिय आणि जिद्दी असलेल्या दोन विद्यार्थ्यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड झाली.ही गोष्ट विद्यार्थ्यांचे व शिक्षकांच्या अचूक अध्ययन व अध्यापनाची पावतीच म्हणावी लागेल.
भारतीय नौसेनेत निवड झाल्यानंतर रवींद्र सरडे व शिवहरी चव्हाण हे दोन्हीही विद्यार्थी शाळेमध्ये गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी आले होते. तेव्हा दोघांनीही त्यांच्या या घवघवीत यशाचे श्रेय आपल्या शाळेला अर्थात सर्व शिक्षक वृंद यांना देत आम्ही शाळेचे सदैव ऋणी राहू असे अभिवचन त्यांनी दिले.
या प्रसंगी रवींद्र सरडे व शिवहरी चव्हाण या दोघांचेही शाळेचे तथा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.आर.बी.कोल्हे, उपप्राचार्य प्राध्यापक श्री.पी.डी. भौरकर,ज्येष्ठ प्राध्यापक श्री.एस. एस.तिवारी,वनश्री.जनाबापू मेहेत्रे,श्री.सुरेश डोईफोडे आदींनी शाळेच्या वतीने स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले तर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अर्पण केल्या.
शाळेतील विद्यार्थ्यांनी यातून उचित प्रेरणा घेण्याचे व भरपूर अभ्यास करून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रे काबीज करत नेत्रदीपक यश मिळविण्याचे आवाहन याप्रसंगी प्राचार्य श्री.आर.बी.कोल्हे व उपप्राचार्य प्राध्यापक पी.डी.भौरकर आदींनी केले.