हिवरखेड प्रतिनिधी: जितेश कारिया
पोलीस उपअधीक्षक रितू खोकर यांची हिवरखेड पोलीसांच्या हद्दीत धडाकेबाज कार्यवाही
अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झरी येथे धडाकेबाज कारवाई करीत झरी येथून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठा, सुगंधित तंबाखू, पान मसाला इत्यादी जप्त केला आहे. सदर साठा सातपुडा पर्वत क्षेत्रातुन मेळघाट मार्गे मध्यप्रदेशातून आणून झरी हिवरखेड इत्यादी परिसरात त्याची विक्री करण्याच्या बेताने आणला गेला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रितू खोकर यांच्या पथकाने वाहनास अडविले असता वाहन चालक व सहकारी वाहन सोडून पसार झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आरोपीचे नाव कळू शकले नाही.
सदर वाहन महिंद्रा पिकअप क्र एम एच 30 एल 3502 आणि गुटखा साठा हिवरखेड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून वृत्त लिहिण्यापर्यंत जप्त मुद्देमालाची किंमत कळू शकली नाही. परंतु सदर मुद्देमाल लक्षवधीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. उपरोक्त कार्यवाही पोलीस उपअधीक्षक रितू खोखर, शे.नासिर, विलास साबे, अंकुश कल्याणकर, इत्यादींनी केली. परंतु घटनास्थळावरून आरोपी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता "त्या" मुख्य आरोपींना अटक होते की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.