गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल अंजनी नदीतच शौचास-महिलांची होतेय गैरसोय-प्रदूषण, दुर्गंधी वाढली
एरंडोल गांधीपुरा भागातील मुंजोबा परिसरातील शौचालय (महिला-पुरूष) एक महिन्यापासून बंद असल्याने नागरीक अंजनी नदी पात्रातच शौचास जात आहेत. महिलांची मात्र मोठी गैरसोय होत असून घाण, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालय टाकीचे बांधकाम अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू असल्यामुळे गैरसोय वाढली असून संबंधित ठेकेदारास नपाने त्वरीत काम पूर्ण करण्याचे कडक आदेश द्यावेत अशी अपेक्षा आहे.
स्वच्छ भारत योजनेेअंतर्गत शहरात सार्वजनिक शौचालयांचे अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आले. काही शौचालये तर वातानुकूलित असल्याची राज्यासह देशात प्रसिध्दी झालेली आहे. परंतू मुुंजोबा परिसरातील शौचालय निकृष्ट असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी असून शौचालय टाकीचे बांधकामच निकृष्ट, अयोग्य असल्याने आणि पाण्याचा तुटवडा असल्याने घाण वाहून जावू शकली नाही परिणामी दुर्गंधी वाढल्याने नवीन टाकीचे बांधकाम नपाने सुरू केले परंतू काम संथगतीने सुरू असल्याने महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली आहे. परिसरात एकमेव शौचालय असल्याने केवळ नाईलाज म्हणून अंजनी नदी पात्रातच नागरीक शौचास जात आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अंजनी नदीतील घाण, कचरा, काटेरी झुडूपे काढून नदी चकाचक करण्यात आली. मात्र आता पुन्हा घाणीमुळे नदीतील दुर्गंधी वाढली. कुत्रे, डूकरे यांचा मुक्त संचार वाढला. नदीचे पाणी वाहते नसल्यामुळे घाण साचून प्रदूषण देखील वाढले आहे. गांधीपुरा भागातील बरीचशी वस्ती गरीब, सामान्य मजूर असल्याने जागेअभावी स्वत:चे शौचालय नाही. त्यामुळे सार्वजनिक शौचालयाचाच वापर केला जातो. निदान आतातरी त्वरीत काम पूर्ण करून पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी अशी अपेक्षा नपाकडून, प्रशासक, आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
