मो.असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी
"काँग्रेस नगरसेवक आबेद खान यांचा ऊर्जा मंत्रीना घरचा आहेर"
लोणार हे जागतिक कीर्तीचे 'अ' दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ असून येथे विविध शहरांमधून तसेच देश-विदेशातून जगप्रसिद्ध लोणार सरोवर पाहण्याकरिता पर्यटक येत असतात. सध्या उष्णतेची लहर सुरू असून सर्वत्र वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होत आहे. विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी व नियम बह्यय भारनियमनामुळे लोणार येथील पर्यटक, नागरिक, रुग्ण व शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तरी याची तात्काळ दखल घेऊन लोणार शहरांमध्ये लावण्यात आलेले भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अबेद खान पठाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी प्रसार माध्यमाद्वारे दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे लोणार येथे १ मार्च २०२२ रोजी विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आले होते, त्या वेळी लोकार्पण कार्यक्रमानंतर त्यांनी ग्राहक मेळावा आयोजित केला होता परंतु विद्युत विभागाने त्या ग्राहक मेळाव्याचे प्रचार आणि प्रसार न केल्याने त्या ठिकाणी ग्राहक अत्यल्प संख्येमध्येच उपस्थित झाले होते. नंतर ते लोणार येथील वनकुटी येथे नाश्ता करण्यासाठी गेले मात्र महाराष्ट्र विद्युत विभागाने त्यांची कोणतीच व्यवस्था न केल्याने त्यांनी लोणार विषयी मनात राग ठेऊन लोणार करिता अतिरिक्त लोडशेडिंग सुरू केले असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक आबेद खान पठाण यांनी केला आहे.
सद्या सर्व समाज बांधवांचे सनउत्सव सुरू आहेत त्या मध्ये मुस्लिम समाजाचे पवित्र रमजानचे उपवास सुरू आहे. या मध्ये लहान मुले वयोवृद्ध तसेच समाज बांधव १६ ते १६ तासाचा उपवास ठेवतात परंतु दुपारच्या वेळेस अतिषय उष्ण तापमान असतांना लोडशेडिंगचे कारण पुढे करून लाईन बंद करण्यात येते. अनेक वेळा समाज बांधवांनी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्युत विभागाला लेखी व तोंडी विनंती करूनही भारनियमन बंद झाला नाही उलट अतिरिक्त भारनियमन सुरू करण्यात आले. या मध्ये रात्री बे रात्री लाईन जात आहे. तरी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी समाजामध्ये कोणतेही दुजा भाव न करता लोणार येथील भारनियमन बंद करावे असा घरचा आहेर नगरसेवक आबेद खान पठाण यांनी केला आहे, यावर ऊर्जामंत्री आणि महावितरण कंपनी काय कार्यवाही करतील याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
