हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया
दोन पंचायत समिती सदस्यांसह अनेकांनी आक्षेप परत घेऊन नगरपंचायत निर्मितीसाठी अधिकाऱ्यांकडे दिले समर्थन पत्र
हिवरखेड नगरपंचायत होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा 22 वर्षांपासून विविध माध्यमातून अविरत संघर्ष सुरूच आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अनेकदा विधिमंडळात आवाज बुलंद केला होता. त्यामुळे शासनाने दि 13 जून रोजी हिवरखेड नगरपंचायतची उद्घोषणा केली. नंतर आक्षेप हरकती घेण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला होता. यामध्ये हिवरखेड येथील दोन पंचायत समिती सदस्यांसह तब्बल २१ नागरिकांनी आक्षेप घेतल्याचे उघड झाल्यावर हिवरखेड वासीयांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती. तद्नंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिवरखेड नगरपंचायत संदर्भातील आक्षेप हरकतीच्या सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती. व त्यांचा अभिप्राय मागविला होता. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी अकोट, तहसीलदार तेल्हारा, गटविकास अधिकारी तेल्हारा यांचा समावेश होता. या समितीने दिनांक १२ ऑगस्ट शुक्रवार रोजी हिवरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मधील तलाठी कार्यालयात आक्षेप घेणाऱ्यांची सुनावणी आयोजित केली होती.
![]() |
| नगरपंचायत आक्षेप मागे घेतानाचे पत्र अधिकाऱ्यांना देताना पंचायत समिती सदस्य |
परंतु या सुनावणीला 21 पैकी अर्ध्यापेक्षा जास्त आक्षेपकर्ते अनुपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबतच उपस्थित असलेल्या बहुतांश आक्षेपकर्त्यांनी आक्षेप यादीतून त्यांचे नाव कमी करून नगरपंचायत आक्षेप मागे घेतो व हिवरखेड मध्ये तात्काळ नगरपंचायत करा असे लेखी अर्ज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काही नागरिकांनी तर त्यांच्या अर्जात लिहले आहे की नगरपंचायत विरोधासाठी आमची सही घेतली हे आम्हाला माहीतच नव्हते, खोटी करणे सांगून काही व्यक्तींनी आमची सही घेतली. आम्ही नगरपंचायतला विरोध कशाला करणार? मग खोटी कारणे सांगून सह्या घेऊन आक्षेप करणारा ते व्यक्ती कोण? ते कशाला नगरपंचायत निर्मिती प्रक्रिया थांबवित आहेत? या विरोध प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? त्याचा तपास प्रशासन करणार का? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले आहेत. आपले आक्षेप मागे घेणाऱ्यामध्ये सौ. गोकुळाताई महेंद्र भोपळे, पंचायत समिती सदस्य, सदफ नाजमीन अ आदिल पंचायत समिती सदस्य, बाळकृष्ण सदाफळे, रोहन झगडे, अनुप धुरदेव, रवी धारपवार, मंगेश कोष्टे, अमोल ढबाले, यांच्या निवेदनाचा समावेश असून या सर्वांनी आक्षेप मागे घेऊन नगरपंचायत होण्यासाठी सहकार्य केले. व आक्षेप मागे घेऊन हे सिद्ध करून दाखवले की "सुबह का भुला श्याम को घर वापस आ जाये तो वो भुला नही कहलाता"
यावेळी डॉ. भरत चव्हाण गटविकास अधिकारी तेल्हारा, राजेश गुरव नायब तहसीलदार तेल्हारा, अनिल खुमकर ग्रामविकास अधिकारी, व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी अकोट हे सुनावणीसाठी पोहोचू न शकल्यामुळे आक्षेपकर्त्यांना पुढील तारखेला आणखी सुनावणीसाठी बोलाविल्या जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. येणाऱ्या सुनावणीत काही अपवाद वगळता उर्वरित बहुतांश आक्षेपकर्ते सुद्धा आक्षेप मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केल्या जात आहे. मोठ्या संख्येने आक्षेप कर्ते गैरहजर राहिले असल्याने त्यातील काही अपवाद वगळता बहुतेक जणांना सुद्धा खोटे कारणे सांगून सह्या घेतल्या गेल्यामूळे ते आले नसावेत अशी चर्चा सुद्धा रंगली होती.
प्रतिक्रिया
अनेक आक्षेपकर्त्यांचे नगरपंचायत बद्दल आक्षेप मागे घेण्याचे निवेदन प्राप्त झाले आहे. व अनेक आक्षेपकर्ते सुनावणीला गैरहजर होते. सुनावणीला समितीचे अध्यक्ष येऊ न शकल्याने सुनावणीसाठी पुढील तारीख लवकरच निश्चित केली जाईल. भरत चव्हाण, गटविकास अधिकारी तेल्हारा..
