असलम परवेज
बुलढाणा प्राथमिक प्रमाणे जिल्ह्यातील सर्व न.प व जि.प.उर्दू माध्यमिक शाळा मराठी शाळांपासून वेगळ्या करून उर्दू माध्यमिक शाळांना स्वतंत्र यूडायस क्रमांक द्यावे व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी संख्येवर उर्दू माध्यमाची स्वतंत्र संचमान्यता करून स्वतंत्र मुख्याध्यापक मंजूर करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्यसचिव शेख ज़मीर रज़ा यांनी शिवजी सभागृह, जि.प. बुलढाणा येथे आयोजित माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या तक्रार निवारण सभेत केली.
या व्यतिरिक्त इतर मागण्या ही करण्यात आल्या. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पीएफएमएस प्रणालीत जिल्ह्यातील अनेक शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेष अनुदान व संयुक्त शाळा अनुदान मिळाले नाही या मुळे शाळा व विद्यार्थी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. हे दोन्ही प्रकारचे प्रलंबित अनुदान यावर्षी मिळावे.
बुलढाणा जिल्ह्यात 24% पेक्षा जास्त उर्दू शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या 15 उर्दू प्राथमिक शिक्षकांना अध्याप कार्यमुक्त केलेले नाही. रिक्त पदांची समस्या सोडवण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने शिक्षक भरती होईपर्यंत आपल्या स्तरावर मानधनावर स्वयंसेवक नेमले आहेत. याच प्रमाणे आपल्या जिल्ह्यात ही स्वयंसेवकांची नियुक्ती करून रिक्त पदांची समस्या सोडविण्यात यावी व आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे व जिल्ह्यात अनेक वर्षांपासून उर्दू माध्यमाची उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पदे तसेच केंद्र प्रमुखांची पदे रिक्त असून ही सर्व रिक्त पदे तातळीने भरावी तसेच बीएससी न केल्याने किंवा इतर कारणांनी ज्या उच्च प्राथमिक विषय शिक्षकांनी पदावनत होण्याचे प्रस्ताव सादर केलेले आहेत ते मंजूर करून उच प्राथमिक विषय शिक्षकांची सर्व रिक्त पदे पदस्थापनेने भरावी.
2018-19 व 2019-20 मध्ये शालेय पोषण आहार चे ऑफलाईन व ऑनलाईन बिल मधील फरकाची रक्कम मिळावी, 24 वर्षे सेवा झालेल्या पात्र शिक्षकांना निवडश्रेणी लागू करावी. ह्या सर्व मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
