जामनेर, प्रतिनिधी
संत गजानन महाराज मंदिर शांतीनगर,उल्हासनगर जि.ठाणे येथुन निघणाऱ्या उल्हासनगर ते शेगाव पायी वारीचे शेंदुर्णीत श्री. गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यंदाचे वारीचे हे २१ वे वर्ष असुन वडाईभोई जि.नाशिक येथुन एक श्वान या वारीत भक्तांच्या सोबत सहभागी होत पायी वारी करत आहे.
दुपारी शेंदुर्णीच्या वेशीवर पायी वारीचे स्वागत शेंदुर्णी, सोयगाव येथील श्री. गजानन महाराज भक्त परिवाराचे वतीने करण्यात आले. संध्याकाळी पारस जैन मंगल कार्यालयात श्री.गजानन महाराज यांच्या रथाचे, ग्रंथाचे पुजन करण्यात येऊन बावन्नीचा सोहळा सामुदायिक साजरा करण्यात आला. सोयगाव येथील श्री. गजानन महाराज यांचे भक्त अरविंद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या प्रवचनात श्री. गजानन महाराज यांच्या जीवनकार्याचा सगळ्यांना आपल्या आयुष्यात कसा लाभ होईल हे सांगितले व निष्काम सेवा, भक्ती करण्याचे आवाहन केले. या पायी वारीचे संयोजक बाळकृष्ण कुलसंगे ,वारीप्रमुख सौ.शलाका निंबकर तर व्यवस्थापक विजयकुमार साखरे आहे. शेंदुर्णी व सोयगाव येथील श्री. गजानन महाराज भक्त परिवाराने यासाठी परिश्रम घेतले.
