जामनेर, प्रतिनिधी
मनुष्याला हा नरदेह महत प्रयत्नाने मिळाला आहे. आपले आयुष्य भगवंताच्या भक्ती मध्ये आपण घालवले पाहिजे, भगवंत आपल्याला निश्चितच कृपादृष्टी करतो फक्त आपण देवाच्या जवळ मनात काही तरी मिळाले पाहिजे या भावनेतुन न जाता देवाच्या प्रती प्रेम घेऊन मी देवाचा देव माझा हा भाव सदैव ठेवला तर भगवंताची आपल्यावर कृपादृष्टी होऊन भगवंत प्राप्ती होईल असे भागवताचार्य श्री.लोकेशानंदजी महाराज (शहादा )यांनी केले आहे.शेंदुर्णीत ९ जानेवारी पासुन श्रीमद् भागवत कथेचे बारी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते आज भागवत कथेची समाप्ती झाली. यावेळी भाविकांची प्रचंड उपस्थिती होती.
कथेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्ण व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.रुक्मिणी मातेला सासरहुन विदाई देतांना वातावरण अतिशय भावनिक झाले होते. महिलांच्या डोळ्यात पाणी होते काही महिला अक्षरशः हुंदके देत होत्या.श्री.लोकेशानंदजी महाराज यांनी खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णीचे महत्त्व विषद करत भगवान श्री.त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिराचे भव्य नुतनीकरण करुन त्याची महती जगभरात जावी यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
भागवत कथेमध्ये भगवंताने असंख्य अवतार घेतले असल्याचे विविध अध्यायामध्ये त्याचे वर्णन असल्याचे सांगितले, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बालपणीचे मित्र सुदामा यांच्या चरित्र सांगितले ,आयुष्यभर सुदामा यांनी आपला सखा भगवान श्रीकृष्ण यांची मनोभावे भक्ती केली. कधीच काही मागितले नाही, अपेक्षा सुद्धा ठेवली नाही परंतु काही न मागताच भगवंतांनी त्याचा उद्धार केला.यासाठी भगवंताची भक्ती करतांना मनात काय मिळेल, मिळावे ही अपेक्षा घेऊन भक्ती करु नये फक्त मनात निःस्मिम भक्ती करावी. मी देवाचा देव माझा ही भावना सदैव मनात ठेवली तर भगवंताची आपल्यावर कृपादृष्टी होईल असे सांगितले.
शेंदुर्णीत भाविकांना भरभरुन आशिर्वाद दिले. श्रीमद् भागवत कथा आयोजन समितीच्या वतीने यावेळी महाराजांचा सत्कार करण्यात आला. असंख्य भाविकांच्या हस्ते तसेच शोभायात्रेत ज्या युवतींनी ढोल पथकात सहभाग घेतला त्यांच्या हातुन आरती करण्यात आली. आज सोमवारी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद भागवत कथेच्या समाप्ती नंतर आज सोमवारी सकाळी ९ वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. नंतर लगेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्रीमद् भागवत आयोजन समिती शेंदुर्णीच्या वतीने करण्यात आले आहे.
