जामनेर प्रतिनिधी
आपली मातृभाषा मराठी आहे. ज्ञानेश्वर महाराज तसेच अनेक संत महंत,मराठी साहित्यिक,कवी, लेखक, विचारवंत यांनी आपल्या भाषेत केलेल्या विपुल साहित्य संपदेमुळे आज जगात मराठी भाषेची महती थोर आहे. सध्याच्या काळात मात्र आपण आपली मराठी मातृभाषा अधिक समृद्धी होण्यासाठी तिच्या प्रचार, प्रसार होण्यासाठी सगळ्यांनीच प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जामनेर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी भाषेच्या प्रा.सौ.विजया दौड यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील न्यायालयाच्या आवारात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज मराठी भाषा तिचे संवर्धन व प्रचार प्रसार यावर आयोजित व्याख्यानात प्रा.सौ.ज्योती दौड यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश डी.एन.चामले होते.प्रमुख अतिथी म्हणुन न्यायाधीश बी.एम.काळे,सरकारी वकील सौ.कृतिका भट,अनिल सारस्वत आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आले. न्या. काळे यांनी मराठी भाषेचा गोडवा तिचे महत्त्व विषद केले.आगामी लोकन्यायालयात अधिकाधिक दावे,खटले,तसेच आपले प्रकरणे आपसात समजुतीने मिटवण्यासाठी लोकन्यायालय चांगली संधी असुन त्याचा सगळ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात न्या. चामले यांनी न्यायालयाची भाषा मराठी भाषा असल्याचे सांगुन आपल्या मातृभाषेच्या संवर्धन, प्रचार प्रसारासाठी अधिकाधिक लोकांनी आधुनिक काळातही मातृभाषेच्या माध्यमातुन संवाद साधण्याचे आवाहन करत येत्या ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.याप्रसंगी सर्व जेष्ठ वकील मंडळी, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य न्यायालयीन कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन ॲड. देवेंद्र पारळकर यांनी केले आभार ॲड. पी.जी.शुक्ला यांनी मानले.
