असलम परवेज:लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार जिल्हा परिषद आणि नगरपरिषद शिक्षकांची एकत्रित शिक्षण परिषद दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी न.प.मराठी प्राथमिक कन्या शाळा लोणार येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. सदर शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थानी न.प. लोणारचे शिक्षण सभापती बादशाह खान होते तर उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी एल. डी चव्हाण लाभले होते. प्रमुख उपस्थिती मध्ये साहेबरावजी पाटोळे, प्राध्यापक गजानन खरात, विस्तार अधिकारी कुंभारे सर इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वांनी यावेळी शिक्षकांशी आपले मनोगत व्यक्त केले.
लोणार केंद्राचे केंद्रप्रमुख गुलाब डी. राठोड आणि न.प. प्रशासन अधिकारी सतीश कापुरे यांच्या नियोजनानुसार व गटशिक्षणाधिकारी एल.डी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने ही शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये एकूण 6 नगरपरिषद आणि 8 जिल्हा परिषदेचे असे एकूण 14 शाळेतील 80 शिक्षकांचा समावेश होता. विशेष म्हणजे या शिक्षण परिषदेला 100% टक्के शिक्षक उपस्थिती होते.
विशेषता: निपुण भारत, अध्ययन स्तर निश्चिती, अध्ययन क्षमता निर्धारित करणे, कृती आराखडा तयार करणे, आणि अप्रगत विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करणे, हे मुख्य विषय होते. शिक्षकांनी आतापर्यंत या दिशेने केलेल्या कामाचा आढावा गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने यामध्ये घेण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी श्री.चव्हाण यांनी शिक्षकांशी संवाद साधताना वेळेचे बंधन पाळणे, ड्रेस कोड आणि शाळेची शिस्त पाळणे, आपले अभिलेखे अद्यावत ठेवणे, केलेल्या कामाचे वर्णन आणि सादरीकरण करता येणे, शाळेतील सर्व सोयी-सुविधा कार्यान्वित ठेवणे, शाळेची रंगरंगोटी सजावट करून मनोरंजक वातावरण तयार करणे, इत्यादी विषयावर सखोल आणि अभ्यासपूर्वक मार्गदर्शक केले.
आमेर सिद्दिकी यांनी माय क्लास ॲपचे प्रात्यक्षिक करून दाखविले तर संदीप जाधव यांनी विविध विज्ञान मॉडेलचे सादरीकरण केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापकांच्या आणि शाळा प्रतिनिधीच्या मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कापुरे यांनी केले तर विशेष समन्वयक म्हणून गुलाब राठोड यांनी काम पाहिले.
