असलम परवेज:लोणार तालुका प्रतिनिधी
नुकतेच ५० वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने बुलढाना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन राजीव गांधी मिलिटरी स्कूल येथे पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र.१ लोणार येथे कार्यरत असलेले संदिप कृष्णा जाधव यांनी प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रकारात बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे व त्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्याचा दर्जेदार वैज्ञानिक तयार व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्या जाते. तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शन पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी मॉडेल व शिक्षक शैक्षणिक साहित्य यांचे एकत्र जिल्हास्तरीय प्रदर्शन कोलवड येथे आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात संदिप कृष्णा जाधव यांनी आपल्या शैक्षणिक साहित्याचे उत्तमरीत्या प्रदर्शन करून शिक्षकामधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्यामुळे लोणार नगर परिषदेच्या सर्व शिक्षक मंडळांनी व शिक्षण विभागांनी त्याचे कौतुक केले आहे तसेच त्यांच्या या यशाबद्दल लोणार नगराध्यक्षा सौ.पूनम पाटोळे, शिक्षण सभापती बादशाह खान आणि सर्व नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. या उपक्रमासाठी त्यांना प्रशासन अधिकारी सतीश कापुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर शाळेचे मुख्याध्यापक राजू वानखेडे व सुनील पुरी यांनी विशेष सहकार्य केले. आता राज्यस्तरावर सुद्धा न.प. चे हे शिक्षक आपला क्रमांक पटकावणार आहे एवढे मात्र निश्चितच!
