हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारिया
जीवनात इच्छाशक्ती व प्रामाणिक समर्पण असलं की अपरिचित कार्यक्षेत्रातही हिमालयाच्या उंचीचे कार्य उभं करता येते. हे ज्यांच्या कर्तुत्ववान जगण्याकडे पाहिलं की आपसूकच उमगते असे थोर व्यक्तिमत्व गुरुवर्य भाऊसाहेब मा.गो.बंड. माणिक ह्या रत्नाच्या बाबतीत मी ऐकले आहे की त्याच्या प्रभावाने आपुलकीच्या भावना जागृत होतात. सहवासातील सारेच प्रेम भावनेने एकत्र येऊन अशक्य ही शक्य काम पूर्ण करतात. ही अनुभूती माझी प्रत्यक्षपणे नसली तरीही माणिक नावाची व्यक्ती सुद्धा ह्या रत्नासम गुण दाखवते हे मात्र मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.1985 ला माझा इयत्ता पाचवीला जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय हिवरखेड येथे प्रवेश झाला. विद्यालयाचा मोठा परिसर, चार अंकी विद्यार्थ्यांची संख्या, 51शिक्षक व 15 शिक्षणेतर कर्मचाऱ्यांचे त्यावेळी प्रमुख होते माणिकलाल गोपाळसा बंड नावाचे गुरुवर्य, जे मला माणिक रत्न वाटतात. ज्यांना विद्यालयाच्या परिघातील सारेच जण मुख्याध्यापक असल्याने सन्मानपूर्वक भाऊसाहेब म्हणून संबोधित करायचे.
बाबांची जेंव्हा अकोला जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्वात मोठ्या हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात बदली झाली. तेंव्हा तेथे इतर कुणीच मुख्याध्यापक म्हणून पदभार घेण्यास तयार होत नव्हते. एकतर परिसराने व परिसरातील सर्वात मोठी शाळा हिवरखेडची होती. बाबांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि तेथील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आपल्या व्यवस्थापन कौशल्याने आदर्श समाज व्यवस्थेचे प्रतिक म्हणून शाळेची ओळख समाजात निर्माण केली. असं सारं आपल्या कर्तृत्ववान वडिलांची जीवनवाट भाऊसाहेब मा. गो. बंड सरांचा मुलगा आशिष मला सांगत होता. अन माझ्यासारख्या असंख्य जणांच्या आयुष्याला सुरेख बनवणाऱ्या एका तपस्वी गुरुवर्याच्या आयुष्याला अधिक जवळून मी समजून घेत होतो.
मा. गो. बंड सरांचा स्वभाव अतिशय चोखंदळ असल्याने गावातील , समाजातील, शाळेतील किंवा सर्वच क्षेत्रातील लोकांसोबत त्यांचा संपर्क असायचा. त्यांच्यातील असलेल्या गुणग्राहकता व प्रेरणादायी वृत्तीमुळे विद्यालयाच्या बाहेरच्या जगातही ते सर्वांचेच प्रिय 'भाऊसाहेब' बनले होते. व्यवस्थापन चालवतांना शाळा सुधार प्रकल्पाकडे बारकाईने व दूरदृष्टीने ते लक्ष द्यायचे. शालेय परिसरात सुंदर फूलझाडे लावून सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी बाग तयार केली होती. प्रशासनाकडून आवश्यक तेवढ्या वर्गखोल्या बांधून घेतल्या, सुसज्ज विज्ञान हॉल, पाण्याची सोय, कंपाऊंड इत्यादी करून शाळेचे बाह्य सौंदर्य वाढवल्याचे आजही आठवते. परिसरातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जायचे काम पडू नये म्हणून पुढाकार घेत विद्यालयाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात रूपांतर केले. शाळेत विज्ञान प्रदर्शन, वृक्षारोपण, स्नेहसंमेलन , हस्तलिखिते, क्रीडा स्पर्धा, स्काऊट गाईड पथक इ. विविध उपक्रम राबवून शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक यांना प्रोत्साहन देऊन शाळा नावारुपास त्यांनी आणली होती. भाऊसाहेबांचे आडनाव बंड असले तरी ते खोडकर नव्हे तर खेळकर स्वभावाचे होते. सर्वच विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. स्वभावानुरुप हसत खेळत प्रासंगिक जीवन ते जगायचे. शाळेच्या प्रगतीचा हरेक टप्पा गाठत असतानाच गावातील प्रत्येक गटातील राजकारणी लोकांशी स्नेहाचे सबंध त्यांनी ठेवले.
अकोला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावर विविध शालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी ते आग्रही असायचे व त्यात ते यशस्वी पण ठरले होते. जि.प.महात्मा गांधी विदयालय व क. महाविद्यालय हिवरखेड येथे प्राचार्य म्हणून भाऊसाहेब बंड सर 29 डिसेंबर 1976 ते 23 जुलै 1988 असे सुमारे एक तप कार्यरत होते. शाळेतील अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्या मनात आपुलकीचे स्थान त्यांनी निर्माण केले. प्रत्येकाच्या मनाचा विचार करून जे अपेक्षित आहे ते दिले. अडचणींवर मार्गदर्शन केले. शिक्षक व विद्यार्थातील गुण ओळखून जबाबदारी देत त्यांच्याकडून योग्य कार्य त्यांनी घडवून आणले.
गुरू वर ज्याचा, विश्वास असेल !!
ज्ञान हे मिळेल, आशीर्वादी !! ह्या कवी प्रवीण हटकर यांच्या अभंग काव्य ओळी प्रमाणे भाऊसाहेब बंड सर यांच्यावर विश्वास ठेवत हिवरखेड व परिसरातील असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त करत आयुष्याचा प्रवास आनंदी करू शकले. त्यांचा आशीर्वाद मिळवू शकले. त्यातील मी एक असल्याचा अभिमान वाटतो.अश्या ह्या थोर भाऊसाहेब मा. गो. बंड ह्या गुरूमाऊलीचा आज स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांच्या कार्यस्मृतीस विनम्र अभिवादन. ---तुळशिदास खिरोडकार
