हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया
जन्माला येऊन एका शतकानंतरही समाजात आपली ओळख कायम ठेवणं हे साऱ्यांच्याच नशिबात नसते. ज्यांच्या असते ते नक्कीच मोठे कर्तृत्ववान असतात. असंच स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत राष्ट्रार्थ जीवन जगलेले जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक - संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी.आज आदरणीय बाबूजी यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने अकोला लोकमत च्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत, पुष्प अर्पण करून मनःपूर्वक आदरांजली अर्पण केली.
गांधीवादी विचारधारेला अखेर पर्यंत जपणारे बाबूजी हे लोकनेते म्हणून महाराष्ट्राच्या मनात आजही कायम आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते जेष्ठ नेते या नात्याने अखेर पर्यंत मंत्रिपदावर राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या खडतर काळात रचनात्मक भारत व महाराष्ट्र घडविण्यात त्यांचे मोठे योगदान होते.अकोला जिल्ह्याचे ते पालकमंत्री राहिले होते. विकासाचा चष्मा लावूनच त्यांची राजकीय वाटचाल असायची. स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी राहिलेल्या हिवरखेडला त्यांनी राज्याचे मंत्री असतांना भेट दिल्याची आठवण मला हिवरखेड येथील जेष्ठ गुरुवर्य स्व. बा. ना. सोनोने गुरुजी यांनी सांगितली होती. त्यावेळी हिवरखेड येथील व्यापाऱ्यांची छोटी सभा माहेश्वरी वस्त्र भांडार येथे त्यांनी घेतली होती. त्यानंतर बाजूलाच असलेल्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. गावातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल प्रेम व्यक्त केले होते व त्यानंतर येथील महात्मा गांधी अस्थिस्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली होती.
गतवर्षी बाबूजींच्या जयंती निमित्ताने राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात संत गाडगेबाबा सेवा समितीच्या माध्यमातून अकोला येथे शिबिर आयोजित करून आम्हाला त्यांच्यातील राष्ट्रप्रेमाला अभिवादन करता आले होते. समाजसेवेचा वसा चालवणारे बाबूजी यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रार्थ घालवल्याचे दिसून येते. जे आजही समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी असेच आहे. बाबूजींच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. --- तुळशिदास खिरोडकार
