"२९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे होणार सन्मान व पुरस्कार वितरण"
असलम परवेज
|बुलढाणा| PM_SHRI या आयएसओ मानांकित हाजी उस्मान डोंगरे, न.प उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.२, बुलढाणा येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत रईसोद्दीन अलीमोडद्दीन काजी यांची, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय उर्दू आदर्श शिक्षक पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय उर्दू शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीने राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार २०२३ शिक्षक दिनाचे औचित्य साधून जाहीर झाले आहे. हे राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार अशा शिक्षकांना प्रदान करण्यात येणार आहे ज्यांनी उर्दू भाषेत या नवीन पिढीला शिक्षण देऊन त्यांना उच्च पदापर्यंत पोहोचविण्याचे काम केले, तसेच शासकीय योजना व उपक्रमातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावून उर्दू भाषेच्या विकासाकरिता विशेष प्रयत्न केले.
या सन्मानासाठी देशातील 100 विशेष शिक्षकांची निवड करण्यात आली असून या मध्ये बुलढाणा येथील रईसोद्दीन काजी यांची उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवड करण्यात आली आहे.
यापूर्वीही रईसोद्दीन काजी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरीमुळे अनेक तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय शासकीय व सामाजिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सदर राष्ट्रीय उर्दू आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा २९ ऑक्टोबर २०२३ रोजी गालिब अकॅडमी, नवी दिल्ली येथे होणार आहे.
यानिमित्ताने सर्व मित्र परिवार, अधिकारी पदाधिकारी, सहकारी शिक्षकांच्या वतीने रईसोद्दीन काजी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात असून त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
