शिवजयंती मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी ज्यांनी दगडफेक केली त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. ही मिरवणूक रात्री ९ वाजता उस्मानिया चौकातून जात असतांना आठवडी बाजाराकडून येणाऱ्या रस्त्याकडून पुन्हा मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या नंतर मात्र दुसऱ्या गटानेही दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त शहरात २८ मार्च रोजी मिरवणुकीचे आयोजन छत्रपती शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष प्रणव राजेश एकडे, उबाठाचे शहर प्रमुख लाला इंगळे व इतर पदाधिकारी, नागरिक सहभागी होते. सायंकाळी अंबादेवी गड येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मोतीपुरा येथून येत असताना त्या ठिकाणी मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याने राज संतोष सोनोने वय १६ हा मोतीपुरा येथील तरुण दगडफेकीत जखमी झाला. यानंतर ही मिरवणूक उस्मानीया चौकातून जात असतांना रात्री ९ च्या सुमारास आठवडी बाजाराकडून येणाऱ्या रस्त्याकडून पुन्हा दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या गटानेही दगडफेक करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तब्बल अर्धा तास सुरू होता. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी दंगाकाबू पथक आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. अनेक जण दगडफेकीत जखमी झाल्याचे वृत्त असून ते पोलिसापर्यंत पोहचले नसल्याचे वृत्त आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
