हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारिया
भारतात अनेक संस्कृती परंपरा टिकून आहेत.सातपुड्याचा पायथ्याशी सुद्धा आदिवासी बांधवाची निसर्गाशी प्रामाणिक असलेली संस्कृती आधुनिकतेच्या वेगवान युगातही टिकून आहे. ह्या संस्कृती सोबत चंदनपूर ह्या गावात गुरुजी म्हणून सेवा कार्य करत साजऱ्या होणाऱ्या विविध सण, उत्सव, समारंभात सहभागी होता यायचे.आज रंगपंचमी निमित्त आठवण झाली कोरकू आदिवासी समुदायासोबत साजऱ्या केलेल्या होळी रंगोत्सव ह्या सणाची.
आदिवासी समुदाय नैसर्गिक जीवन जगत असतो. रंगपंचमी निमित्त आदिवासी कोरकू संस्कृतीचा हा नैसर्गिक जीवनरंग अनेकदा जगता आला. ज्या दिवशी आपण इतरत्र रंगपंचमी साजरी करतो त्यादिवशी कोरकू समुदाय होळी दहन तर दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा करते. दुसऱ्या दिवशी गावातील सर्व बुजुर्ग व्यक्ती सकाळीच होळी जवळ जाऊन होळी व वसंत आगमनाची कोरकू बोलीभाषेत गीते गायन करतात. नृत्य करत वाजत गाजत मुखिया देवाचं पूजन करून आनंद साजरा करत एकमेकास रंगवत मस्त धमाल करतात.
लहान लेकरं, महिला, पुरुष, वयस्कर म्हातारे सारेजन पळसाच्या फुलांपासून रंग करून तो नैसर्गिक रंग उधळून जीवनरंग लूटत आनंदोत्सव साजरा करतात. सोबत बाजारातील मातीचे रंग सुद्धा अलीकडच्या काळात वापर केले जातात. लाऊडस्पीकर वर कोरकू लोकगीते वाजवत सारेच आनंदाने धमाल मस्ती करतात. हा मनाला आनंदचिंब करणारा नजारा मनतृप्त करून जाणारा असतो. आयुष्य खूप सुंदर आहे ते सहजपणे जगायला पाहिजे हे या होळी उत्सवाच्या वेळी आदिवासी बांधवांच्या सहवासात आपसूक मनात येते.
आनंद देऊ अन घेऊ असं जगणाऱ्या या जिवलग सोयऱ्यांसोबत त्यांच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन आपुलकीचं नातं त्याकाळी निर्माण झालं होतं. होळी रंगपंचमी ला ढोल वाजवून सहभाग नोंदवत नवा रंग अनुभवता यायचा. गावातून जाणाऱ्या येणाऱ्या साऱ्यांना रंगवत संपूर्ण गाव धमाल करत असते. होळी पूजन, धुलिवंदन या सोबतच परिसरातील गावागावात जाऊन कोरकू स्त्री पुरुष फगवा मागत नृत्य करत परंपरा जोपसतात. आनंदात जगणाऱ्या ह्या कोरकू आदिवासी समुदायाचा त्याकाळी लळा लागला होता. आजही सातपुड्याच्या पायथ्याशी राहणारे हे आदिवासी बांधव हिवरखेड ला आले की आवर्जून भेट घेतात, घरी येऊन फगवा म्हणून हक्काने अन्न धन्य किंवा रोख रकमेचं दान मागून आशीर्वाद देतात. मिळालेल्या अन्न धान्य, रकमेतून गाव भंडारा केला जातो. उरलेली रक्कम गरजू, गरीब कुटुंबाच्या उभारणीसाठी गावचे आळा पाटील व पंच मंडळी सर्वानुमते खर्च करतात. आज सुद्धा ही परंपरा कायम आहे. आयुष्यात कोरकू संस्कृती जगल्याचा नेहमीच अभिमान वाटतो.
आपणही आंनदात जगणं अन गरजू कुटुंबाचा आधार होणं ही कोरकू संस्कृतीची विचारधारा होळी रंगोत्सवाच्या निमित्ताने स्वीकारून माणुसकीचा जयजयकार करायला पुढे यायला पाहिजे व जगण्याचा नवा रंग स्वीकारला पाहिजे. .--- तुळशिदास खिरोडकार
