बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि प्रेरणादायी विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव येथे वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. किरण कुंभार यांनी केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘समग्र वंदे मातरम् – खंड एक : इतिहास’ या पुस्तकातील मजकुराचे वाचन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या पूर्तीनिमित्त आयोजित ‘वंदे मातरम् गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव’ या उपक्रमांतर्गत प्रकाशक सा. विवेक यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आणि श्री. मिलिंद सबनीस यांनी संशोधन व लेखन केलेल्या या पुस्तकातील मजकुराचे वाचन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी केले. यावेळी या उपक्रमांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या नियमावलीचेही पालन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या मनोगतात त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक वाटचालीचा, साध्या राहणीमानाचा आणि वैज्ञानिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा आढावा घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर यशाची शिखरे गाठता येतात, याचे डॉ. कलाम हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कलाम यांनी भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे कार्यरत असताना त्यांनी भारताच्या उपग्रह प्रक्षेपण वहनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर त्यांनी संरक्षण संशोधन क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. डॉ. कलाम यांचे जीवन केवळ वैज्ञानिक कामगिरीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी, विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता आणि ज्ञानाची अखंड साधना ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांनी आपल्या जीवनातून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची, ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नियमित वाचनाची सवय जोपासावी. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो, विचारांना दिशा मिळते आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, असे आवाहन प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर पुस्तके, चरित्रग्रंथ, आत्मचरित्रे आणि वैचारिक साहित्याचेही नियमित वाचन करावे. वाचनामुळे चिकित्सक विचारशक्ती विकसित होते, व्यक्तिमत्त्व समृद्ध होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे त्यांनी प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. श्रीमती मनुजा सोनार यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हनुमंत निमसे यांनी मानले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाची वृद्धी करणे आणि महाविद्यालयात वाचनसंस्कृतीला चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. तसेच ‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या दृष्टीनेही या वाचन उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
छायाचित्र पुसेगाव: वाचन प्रेरणा दिनानिमित्त विचारमंचावर उपस्थित प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, डॉ. संजय क्षीरसागर, डॉ. हनुमंत निमसे, डॉ. किरण कुंभार व प्रा. श्रीमती मनुजा सोनार. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
.jpg)