(जाफराबाद प्रतिनिधी)
(14 ऑक्टोबर 26 जाफराबाद)
शिवाजी एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, विद्यार्थी-शिक्षण प्रेमी श्री.विठ्ठलराव म्हस्के बाबा यांनी आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी श्री रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, वाघरुळ येथे अचानक भेट देऊन शैक्षणिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. बाबांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना अध्ययन करताना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या, शैक्षणिक संकुलातील सुविधा आणि प्रत्यक्ष वातावरणातील तफावत याबाबत विचारपूस केली. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे, त्याच्या अडचणी सोडवल्याच पाहिजेत, असा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला.
केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीचीही त्यांनी बारकाईने पाहणी केली. शिक्षकांनी आजपर्यंत शिकवलेला अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे का? वर्गात शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना समजते आहे का? यावर सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी त्यांनी -
- विद्यार्थ्यांचे प्रगती अभिलेख, वह्या व गृहपाठाची तपासणी केली.
- शिक्षकांचे दैनिक पाठ नियोजन, वार्षिक नियोजन आणि घटक नियोजन तपासले.
- शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. यु. आर. म्हस्के सर, पर्यवेक्षक श्रीमान एम. एस. कोरडे सर, माजी मुख्याध्यापक बलकार सरयांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एकंदरीत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणि प्रगतीत झालेली सुधारणा पाहून संस्थाध्यक्ष विठ्ठलराव म्हस्के बाबा यांनी समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
तसेच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये या अचानक भेटीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
